
छत्रपती संभाजीनगर, १६ सप्टेंबर (हिं.स.) : मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून, समाजाच्या भावनांशी निगडित सुमारे १५० फुटी भगव्या ध्वजाची उभारणी तसेच मराठा समाज मंदिराच्या उभारणीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता समाजाच्या प्रश्नांवर संघर्षासोबतच संवाद, विकास आणि प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे मत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यासंदर्भात मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी समाजबांधवांना आवाहन केले आहे. या दिवशी आंदोलनाऐवजी त्याग, समर्पण आणि संघटनेचा सन्मान करण्याची भूमिका त्यांनी मांडली.
पालकमंत्री म्हणून धाराशिवमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर मराठा समाजाच्या भावना आणि अपेक्षा नेहमीच महत्त्वाच्या राहिल्या आहेत. समाजाने मांडलेल्या मागण्यांपैकी भगवा ध्वज आणि मराठा समाज मंदिर या महत्त्वाच्या मागण्यांवर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे. हा केवळ विकासकामांचा विषय नसून, समाजाच्या भावनांचा सन्मान करण्याचा प्रयत्न असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.
समाजाच्या मागण्यांबाबत संवादातून मार्ग काढत विकासकामांना गती देण्याची गरज असून, सामाजिक सलोखा आणि परस्पर संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis