
वॉशिंग्टन , 16 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून प्रस्तावित लष्करी करारांतर्गत इस्रायलला २ हजार पौंड वजनाचे अत्यंत शक्तिशाली बॉम्ब देण्याची तयारी सुरू आहे. हेच बॉम्ब गाझामध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस आणि जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाने देण्यास स्थगिती दिली होती.
दोन अमेरिकी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, २.८ अब्ज डॉलरच्या या पॅकेजअंतर्गत सुमारे ४० हजार बॉम्ब देण्याची योजना आहे. मात्र, या योजनेला अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. या व्यवहाराबाबत अमेरिकी काँग्रेसला अनौपचारिकपणे माहिती देण्यात आली आहे. या करारातील बहुतांश रक्कम ‘फॉरेन मिलिटरी फायनान्सिंग’च्या माध्यमातून दिली जाणार आहे.
‘फॉरेन मिलिटरी फायनान्सिंग’अंतर्गत अमेरिकी करदात्यांच्या पैशातून इस्रायलला निधी दिला जातो, असा दावा केला जात आहे. इस्रायल याच निधीचा वापर अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी करतो.इस्रायलची लष्करी क्षमता वाढवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून उचलण्यात येत असलेल्या विविध पावलांमधील हा प्रस्तावित शस्त्रविक्री करार ताजा निर्णय आहे.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून गाझामध्ये सुरू करण्यात आलेल्या युद्धामुळे इस्रायलला वाढत्या आंतरराष्ट्रीय अलगावाला सामोरे जावे लागत आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम झाला होता; मात्र, त्यानंतरही हिंसाचाराच्या घटना घडल्या.
इस्रायल-गाझा संघर्षात शेकडो इस्रायली आणि हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या संघर्षामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे.यापूर्वी, गेल्या ऑगस्टमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. हमास शस्त्रे खाली ठेवण्याऐवजी गाझामध्ये पुन्हा आपला प्रभाव प्रस्थापित करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी ट्रम्प यांना सांगितले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode