
पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा आवाज निर्धारित मर्यादेत ठेवण्यासंदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी पुढे आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवासाठी देण्यात आलेल्या ध्वनिक्षेपक परवानग्यांचा फेरविचार करावा, अशी मागणी ‘लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचा’ने केली आहे.
राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) पश्चिम विभागीय खंडपीठाने १० सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मंचाने केली आहे. शांतता क्षेत्रांमध्ये ध्वनीप्रदूषणासंदर्भातील निर्धारित नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मंचाने म्हटले आहे.मंचाच्या माहितीनुसार, पुणे शहरात १२१, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६५ शांतता क्षेत्रे आहेत. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या परिसरात ध्वनीप्रदूषणासंदर्भातील निर्बंध लागू असल्याचा दावा मंचाने केला आहे. या संदर्भात मंचाने पूना हॉस्पिटल, फर्ग्युसन कॉलेज, एस. पी. कॉलेज, नूमवि, अशोक विद्यालय, गरवारे कॉलेज, मॉडर्न कॉलेज, संचेती हॉस्पिटल आणि पुणे जिल्हा न्यायालय या परिसरांचा उल्लेख केला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिक्षेपक वापरासाठी देण्यात आलेल्या परवानग्या देताना संबंधित परिसर शांतता क्षेत्रात येतो का, तसेच लागू असलेल्या ध्वनीप्रदूषण नियमांचे पालन होते का, याची पडताळणी करावी. त्यानुसार आवश्यक असल्यास परवानग्यांचा फेरविचार करून एनजीटीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी मंचाने केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु