
पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या बाह्यवळण रिंगरोडच्या परिसरातील ११७ गावांच्या नियोजनबद्ध विकासाला आता दिशा मिळणार आहे. या गावांचा सविस्तर विकास आराखडा (डीपी) तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) वेगाने सुरू आहे. अस्तित्वातील जमिनींच्या वापराचे सर्वेक्षण (ईएलयू) पूर्ण झाले असून, भविष्यातील विकासासाठी आवश्यक प्रकल्प आणि त्यासाठी लागणाऱ्या जागांचे नियोजन (पीएलक्यू) अंतिम टप्प्यात आहे.
या ११७ गावांचा विकास आराखडा येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या गावांसाठी सुमारे दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने एमएसआरडीसीची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्ती केली आहे.हवेली, भोर, पुरंदर, वेल्हे आणि मुळशी या पाच तालुक्यांतील गावांचा या आराखड्यात समावेश आहे. रिंगरोडच्या विकासामुळे या भागात भविष्यात मोठ्या प्रमाणात नागरीकरण आणि पायाभूत सुविधांचा विस्तार होण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन केले जात आहे.या गावांचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने समतोल व नियोजनबद्ध विकास करण्याचा आराखडा तयार केला जात आहे. त्यासाठी सध्याच्या जमिनींचा वापर, उपलब्ध सुविधा आणि भविष्यातील गरजा यांचा अभ्यास करण्यात येत आहे.
ईएलयूचे काम पूर्ण झाल्यानंतर आता भविष्यातील विविध प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या जागांचे नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. डीपी पूर्ण झाल्यानंतर रिंगरोडलगतच्या ११७ गावांच्या विकासासाठी कोणत्या भागात कोणत्या सुविधा आणि प्रकल्प उभारायचे, याचे नियोजन अधिक स्पष्ट होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु