गणेशोत्सवात विनापरवाना ड्रोन उडवणे महागात पडणार; पुणे पोलिसांकडून थेट जप्तीची कारवाई
पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)गणेशोत्सवाच्या काळात परवानगीशिवाय ड्रोन उडवून चित्रीकरण करणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. विनापरवाना ड्रोनचा वापर आढळल्यास थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यवर्ती पुण्यात
drone


पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)गणेशोत्सवाच्या काळात परवानगीशिवाय ड्रोन उडवून चित्रीकरण करणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. विनापरवाना ड्रोनचा वापर आढळल्यास थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यवर्ती पुण्यातील गर्दीच्या भागात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे ड्रोनद्वारे चित्रीकरण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी हा निर्णय घेतला.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील विविध भागांत गणेशमूर्तींच्या आगमन मिरवणुका तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळ्यांसाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत काही व्लॉगर्स, फोटोग्राफर्स आणि ड्रोन ऑपरेटरकडून विनापरवाना ड्रोन उडवून चित्रीकरण करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

विशेषतः मध्यवर्ती भागातील गर्दीच्या ठिकाणी अनेक ड्रोन आकाशात घिरट्या घालत असल्याचे आढळून आले. गर्दीचे व्यवस्थापन, महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा आणि ड्रोनमुळे निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.

विनापरवाना ड्रोनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘अँटी ड्रोन पथक’ स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे पथक गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील परिसरात संशयास्पद ड्रोनच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत परवानगीशिवाय ड्रोन उडवून चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून, संबंधित ड्रोन जप्त करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे चित्रीकरण करणाऱ्या व्लॉगर्स, फोटोग्राफर्स आणि ऑपरेटर्सना पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande