
महिनाभर विविध शासकीय योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन
सोलापूर, १६ सप्टेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अभियानाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत निऱ्हाळी मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, तहसीलदार पूनम दंडीले व दिनेश पारगे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, उपविभागीय अधिकारी आणि तालुकास्तरीय अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते.
अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे नियोजन, पात्र लाभार्थ्यांची निवड, शासकीय योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे तसेच सेवा शिबिरांचे आयोजन याबाबत निऱ्हाळी यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. शासन निर्णयातील सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करून सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
प्रत्येक तालुक्यात सेवा शिबिरे
‘सेवा सेतू’ अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत नागरिकांची अर्जप्रक्रिया पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना शिबिराच्या ठिकाणीच विविध योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच प्रत्येक तालुक्यात किमान एका ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित केले जाणार आहे.
विविध सेवांचा नागरिकांना लाभ
या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, स्वामित्व सनद वाटप, शेत व पाणंद रस्ते, शिधापत्रिका, नॉन-क्रीमिलेअर प्रमाणपत्र, वनहक्क दावे, मालमत्ता हस्तांतरण नोंद, नळजोडणी, मालमत्ता कर आकारणी, घरगुती वीजजोडणी, आधार कार्ड, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, शिकाऊ वाहनचालक परवाना, महिला बचत गट नोंदणी आणि ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याशिवाय ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करणे तसेच जमीन खरेदी-विक्री व्यवहारांना जमिनीच्या मोजणीशी जोडणे यांसारख्या सेवांचाही अभियानात समावेश करण्यात आला आहे.
उपक्रमांच्या प्रसिद्धीवरही भर
अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे व्हिडिओ, रील्स आणि छायाचित्रे संबंधित विभागांनी संकलित करून जिल्हा माहिती कार्यालयाकडे पाठवावीत, असेही प्रशासनाने कळविले आहे. विविध शासकीय सेवांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत आणि सुलभ पद्धतीने पोहोचविण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड