
सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या १ हजार ४८३ कोटी रुपयांच्या जलवितरण योजनेत कोणतीही कपात केली जाणार नाही, असा दावा महापौर विनायक कोंड्याल यांनी केला आहे. या योजनेची रक्कम कमी करण्याच्या सूचना मुख्य सचिव राजेश अगरवाल यांनी दिल्या असल्या तरी प्रकल्पाचा सविस्तर पूर्वअभ्यास करूनच आराखडा तयार करण्यात आला आहे. सोलापूर शहरासाठी ही योजना अत्यंत आवश्यक असून, प्रकल्पाला मंजुरी मिळवून तो पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न सुरू असल्याचे कोंड्याल यांनी स्पष्ट केले.
मुंबई येथे मुख्य सचिवांसमोर सोलापूरच्या प्रस्तावित जलवितरण योजनेच्या आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्य सचिवांनी प्रकल्पाच्या प्रस्तावित खर्चासह तांत्रिक बाबी आणि विविध कामांच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले. विशेषतः मूळ ८८३ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची किंमत वाढून १ हजार ४८३ कोटी रुपये कशी झाली, याबाबत मुख्य सचिवांनी माहिती मागविली. तसेच खर्चात कपात करून फेरआराखडा सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
मुख्य सचिवांच्या सूचनांमुळे जलवितरण योजनेला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. मात्र, प्रकल्पाचा आराखडा आवश्यक बाबींचा पूर्वअभ्यास करून तयार करण्यात आला असून, सोलापूर शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही योजना आवश्यक असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यामुळे योजनेची प्रस्तावित रक्कम कायम ठेवून प्रकल्पाला मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड