
सोलापूर, 16 सप्टेंबर (हिं.स.)। पवित्र पोर्टलद्वारे सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी निवड झालेल्या ३३२ शिक्षणसेवकांचे गुरुवारी समुपदेशन होणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने यासाठी प्राधान्यक्रम निश्चित केला असून, समुपदेशनानंतर पात्र शिक्षकांना तालुका व गावनिहाय शाळांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची गरज असलेल्या प्राथमिक शाळांना नवे गुरुजी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पवित्र पोर्टलद्वारे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात निवड झालेल्या ३३२ नवनियुक्त शिक्षणसेवकांची समुपदेशन प्रक्रिया जवाहरलाल नेहरू वसतिगृह येथे पार पडणार आहे. या प्रक्रियेनंतर शिक्षकांना त्यांच्या पात्रतेनुसार आणि उपलब्ध पदांनुसार शाळांचे थेट वाटप केले जाणार आहे.
जिल्हा परिषदेला पवित्र पोर्टलद्वारे एकूण ३४९ उमेदवारांची यादी प्राप्त झाली होती. त्यानंतर झालेल्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत १७ उमेदवार गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांची निवड व नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेल्या उर्वरित ३३२ मराठी माध्यमाच्या शिक्षणसेवकांना आता समुपदेशनाच्या माध्यमातून नियुक्ती मिळणार आहे. या नियुक्त्यांमुळे शिक्षकांची कमतरता असलेल्या प्राथमिक शाळांमधील रिक्त पदे भरण्यास मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड