पुणे- सप्टेंबरसाठी साखरेचा विक्रमी कोटा; दोन दिवसांत दर क्विंटलमागे २०० रुपयांनी घसरले
पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी १३.५० लाख मेट्रिक टन साखरेचा मुबलक कोटा जाहीर केला आहे. बाजारातील मागणीही तुलनेने कमी असल्याने साखरेच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत साखरेचे दर क्विंटलमा
Sugar


पुणे, 16 सप्टेंबर (हिं.स.)केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी १३.५० लाख मेट्रिक टन साखरेचा मुबलक कोटा जाहीर केला आहे. बाजारातील मागणीही तुलनेने कमी असल्याने साखरेच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत साखरेचे दर क्विंटलमागे सुमारे २०० रुपयांनी कमी झाले आहेत.

मंगळवारी घाऊक बाजारात एस-३० ग्रेड साखरेचा दर क्विंटलला ४,८०० रुपयांपर्यंत खाली आला. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यासाठी केंद्र सरकारने १३ लाख मेट्रिक टनांचा कोटा जाहीर केला होता. त्यात आता दुसऱ्या पंधरवड्यासाठी आणखी १३.५० लाख टनांचा कोटा जाहीर करण्यात आला आहे.त्यामुळे सप्टेंबर महिन्यासाठी देशांतर्गत बाजारात एकूण २६.५० लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा उपलब्ध झाला आहे. मोठ्या प्रमाणात साखर बाजारात उपलब्ध होणार असल्याने आगामी काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता बाजारपेठेतील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या कोट्यात १२.५० लाख मेट्रिक टन देशांतर्गत साखरेचा, तर एक लाख टन रिफाइंड साखरेचा समावेश आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून मुबलक कोटा जाहीर करण्यात आल्याची चर्चा बाजारपेठेत आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात साखरेचा पुरवठा वाढल्याने दरावर दबाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande