येमेनमध्ये सौदीचे एफ-१५ लढाऊ विमान पाडल्याचा हूतींचा दावा; व्हिडीओ जारी
सना, 17 सप्टेंबर (हिं.स.)।इराण समर्थित हूती बंडखोरांनी बुधवारी दावा केला की, त्यांनी येमेनमध्ये सौदी अरेबियाचे एफ-१५ लढाऊ विमान पाडले आहे. त्यांनी एका व्हिडिओमध्ये दोन प्रकारचे दृश्य दाखवले आहेत. पहिल्या दृश्यात एका लक्ष्य प्रणालीद्वारे विमानाला लक
येमेनमध्ये सौदीचे एफ-१५ लढाऊ विमान पाडल्याचा हूतींचा दावा; व्हिडीओ जारी


सना, 17 सप्टेंबर (हिं.स.)।इराण समर्थित हूती बंडखोरांनी बुधवारी दावा केला की, त्यांनी येमेनमध्ये सौदी अरेबियाचे एफ-१५ लढाऊ विमान पाडले आहे. त्यांनी एका व्हिडिओमध्ये दोन प्रकारचे दृश्य दाखवले आहेत. पहिल्या दृश्यात एका लक्ष्य प्रणालीद्वारे विमानाला लक्ष्य केले जात असल्याचे दिसत आहे, तर दुसऱ्या दृश्यात कथितरित्या विमानाचे अवशेष आणि त्यांच्यासोबत शस्त्रधारी लोक उभे असल्याचे दिसत आहे.

हूती बंडखोरांनी विमानातील वैमानिकांबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. सौदी अरेबियाच्या बाजूनेही अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.मात्र, या व्हिडिओची सत्यता अद्याप स्वतंत्रपणे पडताळण्यात आलेली नाही. वृत्तानुसार, व्हिडिओमध्ये दिसणारे विमान सौदी हवाई दलाचे सर्वात आधुनिक मॉडेल एफ-१५एसए असल्याचे दिसते. अहवालानुसार, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या विमानावर ५५३९ हा टेल नंबर आहे. हा क्रमांक देशाच्या नैऋत्य भागात असलेल्या किंग खालिद एअर बेसच्या ५५व्या स्क्वॉड्रनला देण्यात आलेला आहे.जर या दाव्याची पुष्टी झाली, तर या संघर्षात हूती बंडखोरांनी एखादे लढाऊ विमान पाडण्याची ही पहिलीच घटना ठरेल. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. हूती बंडखोरांनी सौदी अरेबियावरील हल्ले तीव्र केले आहेत.

हूती बंडखोरांनी सौदी अरेबियाची नाकेबंदी करण्याची घोषणा केली असून, गेल्या काही आठवड्यांपासून ते या देशावर सातत्याने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले करत आहेत. मंगळवारी झालेल्या हल्ल्यांमुळे जेद्दाह येथील देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करावा लागला. तसेच यानबू, ताइफ, अबहा आणि जाझानसह अनेक शहरांमध्ये सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला.याशिवाय, बुधवारी सौदी अरेबियाने हूती बंडखोरांवर इस्लाममधील सर्वात पवित्र शहर असलेल्या मक्केवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

हूती लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सरी यांनी दावा केला की, हूती दलाने सौदी अरेबियाचे एफ-१५ लढाऊ विमान पाडले आहे. हे विमान येमेनमधील मआरिब शहरात सौदी समर्थित दलाला मदत करण्यासाठी लष्करी कारवाई करत होते. सरी यांच्या म्हणण्यानुसार, हूती बंडखोरांनी स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या मदतीने एफ-१५ विमान पाडले.

सरी यांनी पुढे दावा केला की, पाडण्यात आलेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी येमेनमध्ये दाखल झालेल्या सौदी अरेबियाच्या एफ-१५ आणि युरोफायटर टायफून या लढाऊ विमानांचाही हूती बंडखोरांनी सामना केला.दरम्यान, येमेनमध्ये हूती बंडखोर आणि सरकारी सुरक्षा दलांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो नागरिक विस्थापित झाल्याची माहिती आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande