
भारत-रशिया संबंधांतील योगदानाचे केले कौतुक
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर (हिं.स.)।रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत संदेश पाठवला. या संदेशात त्यांनी भारत आणि रशियामधील द्विपक्षीय संबंध तसेच अलीकडेच दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय भेटींचा उल्लेख केला. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले. तसेच, नवी दिल्ली आणि मॉस्को यांच्यातील घनिष्ठ संबंध अधोरेखित केले.
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटले, “आपल्या देशवासीयांकडून आपल्याला मोठा सन्मान मिळतो आणि जागतिक पटलावरही आपले महत्त्वाचे स्थान आहे. हे पूर्णपणे योग्य आहे. भारत आणि रशियामधील विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आपल्या वैयक्तिक योगदानाचे कितीही कौतुक केले, तरी ते कमीच आहे.”
पुतिन यांनी दोन्ही देशांच्या सरकारमधील प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला. तसेच, भारताच्या आपल्या राजनैतिक दौऱ्यादरम्यान करण्यात आलेल्या स्वागत-सत्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “गेल्या आठवड्यात नवी दिल्लीच्या माझ्या दौऱ्यादरम्यान मला आणि रशियन शिष्टमंडळाला मिळालेल्या उबदार आणि स्नेहपूर्ण स्वागताबद्दल तसेच आदरातिथ्याबद्दल मी आभार व्यक्त करू इच्छितो.”
पुतिन यांनी पुढे म्हटले, “आपली चर्चा निःसंशयपणे ठोस, स्पष्ट आणि फलदायी होती. नेहमीप्रमाणेच, आपल्याशी संवाद साधताना मला खूप आनंद झाला. आमच्या चर्चेतून पुन्हा एकदा आपली असाधारण राजकीय समज आणि दूरदृष्टी दिसून आली.आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर तसेच द्विपक्षीय माध्यमांतून भविष्यातही सक्रिय राजनैतिक समन्वय कायम ठेवण्याच्या दोन्ही देशांच्या बांधिलकीचा रशियन राष्ट्राध्यक्षांनी पुनरुच्चार केला.
पुतिन यांनी पुढे म्हणाले की, आपल्या मित्रदेशांच्या हितासाठी आवश्यक असलेल्या द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आम्ही निश्चितच रचनात्मक सहकार्य सुरू ठेवू.रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन रविवारी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दोन दिवसीय ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर नवी दिल्लीहून रवाना झाले. परिषदेदरम्यान पुतिन यांनी ब्रिक्सच्या दोन सत्रांमध्ये सहभाग घेतला. तसेच भारत मंडपम येथे आयोजित ‘भारत इनोव्हेट्स’ प्रदर्शनालाही भेट दिली.
शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात द्विपक्षीय बैठकही झाली. या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. याशिवाय ‘आर्थिक सहकार्य कार्यक्रम २०३०’ची अंमलबजावणी, तसेच पायाभूत सुविधा, ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावरही चर्चा झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode