हैदराबादच्या २८ वर्षीय तरुणाचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांची भारत सरकारकडे मदतीची मागणी
चेन्नई , 17 सप्टेंबर (हिं.स.)। अमेरिकेत राहणाऱ्या हैदराबाद येथील मोहम्मद जाबेर हुसैन यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. हुसैन यांचा विवाह अवघ्या १७ दिवसांपूर्वी झाला होता. २८ वर्षीय मोहम्मद जाबेर हुसैन हे मॅसॅच्युसेट्समधील लोवेल येथील त्यांच्य
अमेरिकेत हैदराबादच्या २८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू;     कुटुंबीयांची भारत सरकारकडे मदतीची मागणी


चेन्नई , 17 सप्टेंबर (हिं.स.)। अमेरिकेत राहणाऱ्या हैदराबाद येथील मोहम्मद जाबेर हुसैन यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. हुसैन यांचा विवाह अवघ्या १७ दिवसांपूर्वी झाला होता. २८ वर्षीय मोहम्मद जाबेर हुसैन हे मॅसॅच्युसेट्समधील लोवेल येथील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आले.

मोहम्मद जाबेर हुसैन हे अमेरिकेत सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करत होते. त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह हैदराबादला परत आणण्यासाठी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असून हुसैन यांचा मृतदेह हैदराबादला आणण्याची व्यवस्था करणे त्यांच्यासाठी कठीण आहे.कुटुंबीयांच्या या आवाहनानंतर मजलिस बचाओ तहरीकचे प्रवक्ते अमजद उल्लाह खान मदतीसाठी पुढे आले. अमजद उल्लाह खान यांनी हुसैन यांचे वडील मोहम्मद जाकिर हुसैन यांनी परराष्ट्रमंत्र्यांना लिहिलेले पत्र ‘एक्स’वर पोस्ट केले.

अमजद उल्लाह खान यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले, “या अत्यंत दुःखद प्रसंगी कुटुंबाला भारत सरकारच्या सहकार्याची गरज आहे. कोणताही विलंब न करता जाबेर यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे परत आणण्यासाठी आपण तातडीने मानवीय आधारावर हस्तक्षेप कराल, अशी मला पूर्ण आशा आहे.”

हुसैन यांचे वडील मोहम्मद जाकिर हुसैन यांनी माहिती देताना सांगितले, “माझ्या मुलाचा २८ ऑगस्ट रोजी टेक्सासमध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर तो मॅसॅच्युसेट्सला परतला, जिथे तो नोकरी करत होता. मात्र, त्याची पत्नीही त्याच्यासोबत मॅसॅच्युसेट्सला परतली होती की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.”कुटुंबीयांच्या माहितीनुसार, हुसैन यांनी १४ सप्टेंबर रोजी कुटुंबीयांशी शेवटचे बोलणे केले होते. कुटुंबीयांशी फोनवर बोलल्यानंतर सुमारे आठ तासांनी त्यांच्या रूममेटने कुटुंबीयांना फोन करून हुसैन यांच्या मृत्यूची माहिती दिली. रूममेटने हुसैन यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचे सांगितले.

घटनेनंतर हुसैन यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळाली होती की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या कुटुंबीयांना शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. या अहवालांमधून त्यांच्या मृत्यूची नेमकी परिस्थिती आणि कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हुसैन हे २०२१ मध्ये कनेक्टिकट येथील युनिव्हर्सिटी ऑफ न्यू हेवनमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अमेरिकेत गेले होते. उपलब्ध माहितीनुसार, २०२३ मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर ते ‘एस्टिमेटर’ नावाच्या कंपनीत इंटर्न म्हणून रुजू झाले.त्यानंतर त्यांनी ‘ग्रीन इंटरनॅशनल एफिलिएट्स इंक.’ या कंपनीत काम सुरू केले. तेथे त्यांनी तीन वर्षांहून अधिक काळ काम केले. याच वर्षी त्यांनी पुन्हा नोकरी बदलली आणि मॅसॅच्युसेट्सस्थित ‘लोचनर’ या कंपनीत काम करत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande