शेतकरी प्रश्नांवर सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचे उद्धव ठाकरेंचे आवाहन
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त केला छत्रपती संभाजीनगर दौरा छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.) : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला. या
उद्धव ठाकरे


मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त केला छत्रपती संभाजीनगर दौरा

छत्रपती संभाजीनगर, 17 सप्टेंबर (हिं.स.) : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी, मराठवाड्यातील प्रश्न तसेच विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. मराठवाड्यातील शिवसैनिकांनी शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरावे, तसेच सरकारविरोधात मोर्चा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. येत्या 5 ऑक्टोबरनंतर मी आणि आदित्य दौऱ्यावर आहोत. आपले नेते आहेत. पंचनामे बरोबर होतात की नाही, ते आपण बघणार आहोत. नुकसान भरून देण्याची जबाबदारी आपली आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यातील सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी सर्व समाजघटकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. सत्ताधारी एकमेकांना लढवत असून मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

तमाम जाती-पातींना आवाहन करतो की, आपण एकजुटीने एकत्र येऊ. सगळे प्रश्न एकत्र येऊनच सुटतील. जरांगे पाटील आपले आहेत, सगळे आपले आहेत. आपण सगळे एकत्र येऊ असे ठाकरे म्हणाले.

मुस्लिम समाजातील अनेक लोक आपल्या पक्षासोबत आल्याचा दावाही त्यांनी केला. “बरेच मुस्लिम आमच्यासोबत आले, कारण त्यांना कळलं. आमचा मुस्लिम महापौर आहे, त्यावर टीका केली असेही ते म्हणाले.

शिंदे यांच्यावर टीका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. “सध्या प्राण पणाला लावून जरांगे आंदोलन करतोय आणि उपमुख्यमंत्री परदेशात जाऊन पुरस्कार घेत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्राच्या बहुभाषिक स्वरूपाच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. अमित शाह म्हणतात महाराष्ट्र बहुभाषिक राज्य आहे. हे गुजरात, कर्नाटक आणि दक्षिण भारतात जाऊन बोलू शकतात का? इथे बोलू शकतात, कारण बाजूला हे गद्दार बसले होते, असे ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे यांच्यावरही टीका करत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा संदर्भ दिला.

मराठवाडा देशाला पंतप्रधान देऊ शकत होता’

मराठवाड्यातील दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय योगदानाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली.

“एक काळ असा होता की पंतप्रधान मराठवाड्याचा होईल, असे चित्र होते. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपची पाळेमुळे रुजवली. प्रमोद महाजन आपल्याला उद्याचे पंतप्रधान वाटायचे. त्यांनी मराठवाड्यातून देशाला पंतप्रधान देऊ शकेल असा नेता तयार केला होता. मात्र प्रमोदजी अनपेक्षितपणे आपल्यातून गेले. गोपीनाथ मुंडेही आज आपल्यात नाहीत. दोघेही सत्तेचा उपभोग घेऊ शकले नाहीत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठवाड्यातील प्रश्नांसाठी संघटनात्मक पातळीवर सक्रिय होण्याचे आवाहन करत ठाकरे यांनी शिवसैनिकांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाची भूमिका घ्यावी, असे सांगितले.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande