जळगावात भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
जळगाव, 17 सप्टेंबर (हिं.स.) शिरपूर-चोपडा महामार्गावर भरधाव मालवाहतूक ट्रकने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सावेर गावाच्या शिवारात घडली. मृत चौघेही मध्यप्रदेशातील रहिवासी अ
जळगावात भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू


जळगाव, 17 सप्टेंबर (हिं.स.) शिरपूर-चोपडा महामार्गावर भरधाव मालवाहतूक ट्रकने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सावेर गावाच्या शिवारात घडली. मृत चौघेही मध्यप्रदेशातील रहिवासी असून रोजगारासाठी शिरपूर तालुक्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मध्यप्रदेशातील चौघे युवक रोजगाराच्या शोधासाठी शिरपूर तालुक्यात आले होते. यातील इसराम भिलाला हे अन्य तिघांना सोबत घेऊन मोटारसायकल क्रमांक एमपी-१०-झेडएन-३२२६ वरून शिरपूरहून चोपड्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, सावेर गावाच्या शिवारात चोपड्याकडून शिरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक क्रमांक एचआर-५५-एटी-१३५५ ने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातात दुचाकीवरील चौघांचा मृत्यू झाला. या अपघातात लुमरीया लालसिंग भिलाला (२५), इसराम कालू भिलाला (४८), दोघे रा. बुद्रा, ता. राजपूर, जि. बडवानी, तसेच सुरेश रमेश कनासे (२६) आणि महेश लालसिंग कनासे (३१), दोघे रा. बालिया, ता. सनावद, जि. खरगोन, मध्यप्रदेश यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच महामार्गालगत शेतात काम करणाऱ्या मजुरांसह काही वाहनचालकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघाताची माहिती घेत पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पन्नालाल कालूराम सिसोदिया (रा. बुद्रा, ता. राजपूर, जि. बडवानी, मध्यप्रदेश) यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande