झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तावेंग्वा मुकुहलानी यांची आयसीसीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर (हिं.स.) । झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तावेंग्वा मुकुहलानी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नव्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सिंगापूरचे इम्रान ख्वाजा यांची जागा घेतली आहे. आयसीसीच्या संचालक मं
जय शाह आणि तावेंग्वा मुकुहलानी यांचा संग्रहित फोटो


नवी दिल्ली, 17 सप्टेंबर (हिं.स.) । झिम्बाब्वे क्रिकेटचे अध्यक्ष तावेंग्वा मुकुहलानी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नव्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सिंगापूरचे इम्रान ख्वाजा यांची जागा घेतली आहे. आयसीसीच्या संचालक मंडळाने मुकुहलानी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. ते नोव्हेंबर २०२७ पर्यंत या पदावर राहतील.

आयसीसीने म्हटले आहे की, मुकुहलानी सध्या आयसीसीच्या वित्त आणि वाणिज्यिक व्यवहार समिती (F&CA) आणि नामनिर्देशन समितीचे सदस्य आहेत. ते मनुष्यबळ आणि मानधन समितीचे अध्यक्षही आहेत. ही नियुक्ती आफ्रिकन क्रिकेटसाठी एका महत्त्वपूर्ण वेळी झाली आहे. झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि नामिबियासोबत २०२७ मध्ये आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची तयारी करत आहे.

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले, आयसीसी उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मी तवेंग्वा मुकुहलानी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. क्रिकेट प्रशासनातील त्यांचा अनुभव, जागतिक खेळाची जाण आणि त्याच्या विकासाप्रती असलेली त्यांची कटिबद्धता आयसीसी मंडळासाठी एक मोठी संपत्ती ठरेल. शाह पुढे म्हणाले, तवेंग्वा यांनी त्यांच्या सहकारी संचालकांचा विश्वास संपादन केला आहे. आपल्या सदस्य देशांमध्ये क्रिकेट अधिक मजबूत करण्यासाठी आणि जगभरात या खेळाच्या वाढीसाठी अधिक संधी निर्माण करण्याकरिता त्यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.

ते पुढे म्हणाले की, मुकुहलानी यांची निवड ही झिम्बाब्वेसाठी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे, कारण ते उपाध्यक्ष बनणारे पहिले झिम्बाब्वेचे नागरिक आहेत. मुकुहलानी म्हणाले, मी आमचे अध्यक्ष जय शाह यांच्यासोबत मिळून काम करण्यास उत्सुक आहे. त्यांचे नेतृत्व, ऊर्जा आणि महत्त्वाकांक्षेने आयसीसीला एक स्पष्ट उद्देश दिला आहे, ज्यामध्ये क्रिकेटचा विकास करणे, आपल्या सदस्यांसाठी संधी निर्माण करणे आणि नवीन प्रेक्षक व बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

ते म्हणाले, क्रिकेट एका रोमांचक युगात प्रवेश करत आहे, विशेषतः ऑलिम्पिक खेळांमधील त्याचे पुनरागमन आणि सततच्या जागतिक विस्तारामुळे. मी अध्यक्ष जय शाह आणि माझ्या सहकारी संचालक मंडळाला पाठिंबा देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर क्रिकेटच्या सर्वोत्तम हितासाठी आमच्या सामायिक प्राधान्यक्रमांना पुढे नेण्यासाठी उत्सुक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande