
लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।- आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या डायल 112 सेवेचा गैरवापर करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्तीवर भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास सदाशिव कांबळे यांनी डायल 112 क्रमांकावर फोन करून खोटी माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस नियंत्रण कक्षाने तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले. मात्र पडताळणी केली असता सदर माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे निष्पन्न झाले.या प्रकारामुळे खऱ्या गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता असते, तसेच शासकीय यंत्रणेचा वेळ आणि संसाधनांचा अपव्यय होतो.
या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 492/2026, कलम 217 BNS (भारतीय न्याय संहिता) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 217 नुसार शासकीय अधिकाऱ्याला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे हा दंडनीय अपराध आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे भादा हे करीत आहेत.
पोलिसांचे आवाहन:
पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर व भादा पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,
1. डायल 112 ही सेवा केवळ आपत्कालीन परिस्थिती - जसे अपघात, मारहाण, आग, महिलांवरील अत्याचार, नैसर्गिक आपत्ती यासाठीच आहे.
2. या क्रमांकावर खोटी माहिती देऊ नये, मस्करी करू नये किंवा गैरवापर करू नये.
3. खोटी माहिती दिल्यास कलम 217 BNS नुसार कायदेशीर कारवाई होईल, ज्यात दंड आणि तुरुंगवासाची तरतूद आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis