
आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते वरुड बुद्रुक येथे संस्थेचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.) : ग्रामीण भागाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आर्थिक संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, अशा संस्थांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळते, असे प्रतिपादन आमदार संतोष दानवे यांनी केले.
जाफ्राबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथे श्री. स्वप्निल करडेल यांच्या ‘महाधन अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड’ या संस्थेचा उद्घाटन सोहळा आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसेच स्थानिक व्यापाऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अशा संस्थांचा मोठा हातभार लागतो. ‘महाधन अर्बन मल्टिपल निधी लिमिटेड’ ही संस्था जनसामान्यांच्या आर्थिक प्रगतीचे माध्यम बनेल, असा विश्वास आमदार दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्घाटन सोहळ्यास विजयनाना परिहार, दीपक वाकडे, संतोष पाटील लोखंडे, नाना पाटील भागिले, विजय परिहार, राजू साळवे, विलास आप्पा शिंदे, दत्ता हांडके, जुनू शेठ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नव्याने सुरू झालेल्या संस्थेला शुभेच्छा दिल्या.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis