ननऊ सदस्यीय तांत्रिक समितीकडून आता मंडळांच्या देखाव्यांची प्रत्यक्ष पाहणी
नाशिक, 18 सप्टेंबर (हिं.स.)। सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४२ मंडळांचे अर्ज दाखल गणेशोत्सवाच्या माध्यमातून सिंहस्थ महाकुंभ मेळा २०२७ची जनजागृती करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या ‘सिं
ननऊ सदस्यीय तांत्रिक समितीकडून आता मंडळांच्या देखाव्यांची प्रत्यक्ष पाहणी


नाशिक, 18 सप्टेंबर (हिं.स.)।

सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४२ मंडळांचे अर्ज दाखल

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सिंहस्थ महाकुंभ मेळा २०२७ची जनजागृती करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या ‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धेला गणेश मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ४२ मंडळांनी स्पर्धेसाठी अर्ज दाखल केले आहेत. अधिकाधिक मंडळांना सहभागी करून घेण्यासाठी नोंदणीची मुदत आजपर्यंत ठेवण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांनंतर आता सहभागी गणेश मंडळांच्या देखाव्यांची आणि उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. यासाठी नऊ सदस्यीय तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली असून, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे हे समितीचे अध्यक्ष आहेत. प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी योगेश चंद्रे हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

समितीकडून गणेश मंडळांनी साकारलेल्या देखाव्यांची, जनजागृती उपक्रमांची तसेच सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून स्पर्धेतील निकषांनुसार मूल्यमापन केले जाणार आहे. सिंहस्थ महाकुंभच्या संकल्पनेशी सुसंगतता, सर्जनशीलता, नागरिकांचा सहभाग, अंमलबजावणीची गुणवत्ता आणि शाश्वतता या प्रमुख निकषांचा विचार केला जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या व्यापक लोकसहभागाचा उपयोग करून सिंहस्थ महाकुंभ मेळ्याचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व, नाशिक-त्र्यंबकेश्वरचा वारसा, पर्यावरणपूरक व शाश्वत कुंभ, तंत्रज्ञानाचा वापर तसेच भाविकसेवा याबाबत जनजागृती करण्याचा या स्पर्धेमागील उद्देश आहे.

पाच प्रवर्गांत प्रत्येकी एक लाखांचे पारितोषिक

स्पर्धेत पाच प्रमुख प्रवर्ग असून प्रत्येक प्रवर्गातील विजेत्या मंडळाला एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय नावीन्यपूर्ण आणि विशेष संकल्पनेसाठी दोन लाख रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.

अधिकाधिक गणेश मंडळांनी सिंहस्थ महाकुंभच्या जनजागृती उपक्रमाशी जोडले जावे, यासाठी प्राधिकरणाने या स्पर्धेची नोंदणीची मुदत यापूर्वी १० सप्टेंबरवरून १७ सप्टेंबरपर्यंत वाढविली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande