
रायगड, 18 सप्टेंबर (हिं.स.)।
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नेरळ पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे हजारे नगर (नेरळ) येथील ‘भोपेले लक्ष्मी कॅस्टीलो’च्या 'सी' विंगमधील रूम नंबर ४०६ (चौथा मजला) येथे अल्पवयीन पीडिता तिच्या मित्रांसोबत (आरोपी क्र. १ व २) राहत होती. मुलगी अल्पवयीन असल्याचे पूर्ण ठाऊक असतानाही, दोन्ही आरोपींनी तिच्याशी शारीरिक लगट केली. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याचे समोर आले.
या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २०९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४, ६४(२)(एफ), ६५(१), ७४, ७९, ३(५) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पॉक्सो - POCSO) चे कलम ४, ६, ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही संशयित आरोपींना तत्काळ अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (पोसई) वरक करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)