रत्नागिरी : वाहन पेटवून देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी, 18 सप्टेंबर (हिं.स.) । लॉजच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या क्रूझर वाहनाची तोडफोड करून ती पेटवून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी आकाश चंद्रकांत खेत्री (रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) या संशयिताविरोधात शहर पोलीस ठाण्या
पेटवून दिलेले वाहन


रत्नागिरी, 18 सप्टेंबर (हिं.स.) । लॉजच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या क्रूझर वाहनाची तोडफोड करून ती पेटवून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी आकाश चंद्रकांत खेत्री (रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) या संशयिताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कडेगाव (जि. सांगली) येथील अशोक नागाप्पा गोठेकर (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

फिर्यादी अशोक गोठेकर हे त्यांचे मित्र अशोक बागडे यांच्या मुलीचा आणि जावयाचा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या उद्देशाने राहुल काटकर यांच्या मालकीची क्रूझर गाडी (एमएच-१०-बीएन-७१५२) घेऊन रत्नागिरीत आले होते. नातेवाइकांची सायंकाळची बैठक निष्फळ ठरल्याने हा विषय शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसमोर मांडण्याचे ठरले होते. त्यानंतर गोठेकर आठवडा बाजार परिसरातील एका लॉजमध्ये मुक्कामी थांबले असता, त्यांनी आपले वाहन लॉजच्या पार्किंगमध्ये उभे केले होते.

गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पार्किंगमधील गाडीला आग लागल्याचे समोर आले. अग्निशमन दलाने आग विझवेपर्यंत वाहनाचे प्रचंड नुकसान झाले होते. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, संशयित आरोपी आकाश खेत्री हा वाहनाच्या काचा फोडून ज्वलनशील पदार्थाच्या साहाय्याने गाडी पेटवून देताना उघडकीस आले. या पुराव्यांच्या आधारे शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande