
लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी हर्षवर्धन सपकाळ, राज्याचे माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे तसेच लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्या मान्यतेने नुकतीच लातूर जिल्हा काँग्रेसची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या नूतन जिल्हा कार्यकारणीची पहिली विशेष बैठक आज जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन, लातूर येथे अत्यंत उत्साहात पार पडली. या बैठकीस नूतन पदाधिकाऱ्यांची जवळपास शंभर टक्के उपस्थिती दिसून आली.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी काँग्रेसच्या आगामी दिशा आणि संघटनात्मक ध्येयधोरणांची माहिती दिली. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नाशिक येथील शिबिरातून मिळालेल्या संदेशानुसार जिल्ह्यात बूथ, गाव आणि प्रभाग पातळीपर्यंत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीचा बांधावर जाऊन आढावा
लातूर जिल्ह्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी, शेतमजूर आणि पशुधन मोठ्या संकटात सापडले आहे. या संकटाच्या काळात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही अभय साळुंके यांनी दिली.दुष्काळाच्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी येत्या पाच दिवसांत काँग्रेसचे सर्व पदाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून प्रत्येक तहसील कार्यालयात नव्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत तसेच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत प्रत्येक महसूल मंडळ, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. सरकारला जाब विचारण्यासाठी तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही साळुंके यांनी दिला.
मसलगा पाटी येथील शेतकऱ्यांवरील गुन्ह्यांचा निषेध
बैठकीत प्रशासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. मसलगा पाटी येथे दुष्काळी मदतीच्या मागणीसाठी शांततेत रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याच्या घटनेचाही बैठकीत निषेध करण्यात आला.दुष्काळी मदतीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणे हा अन्यायकारक निर्णय असल्याचे सांगत संबंधित गुन्हे तात्काळ आणि बिनशर्त मागे घेण्यात यावेत, असा ठराव नूतन जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.संकटग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण न्याय मिळेपर्यंत काँग्रेसचा हा लढा सुरूच राहील, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनाच्या प्रश्नांसाठी आगामी काळात जिल्हाभर आंदोलनात्मक भूमिका घेण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis