
जळगाव, 18 सप्टेंबर (हिं.स.)चाळीसगाव शहर व स्थानिक गुन्हे शाखेने गुटखा व पानमसाल्याची अवैध विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, गुटखा, सुगंधित पानमसाला, तंबाखू तसेच आयशर वाहन असा एकूण १६ लाख ९१ हजार ६८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अमितकुमार मेनन यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, विनोद किरणा स्टोअर्स, ठाकूरवाडी, हिरापूर रोड, चाळीसगाव येथे प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून आरोपी नाचिकेत सुनील येवले, रा. हिरापूर रोड, चाळीसगाव याला ताब्यात घेतले.या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाला तसेच आयशर वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी मधुकर धोंडू इंगळे (वय ४८, रा. खेडी, शिवनगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील आयशर वाहन क्रमांक MH-46-AY-1844 तपासले असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाला आढळून आला. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये प्रतिबंधित गुटखा व पानमसाला १ लाख ९१ हजार ६८८ रुपये, तर आयशर वाहनाची किंमत १५ लाख रुपये आहे. असा एकूण १६ लाख ९१ हजार ६८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर दोन्ही गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला गुटखा व पानमसाला कोठून आणण्यात आला होता, या अवैध गुटखा तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण आहे व त्याच्यासह या व्यवसायात आणखी कोणकोणाचा सहभाग आहे, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, जळगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर