
छत्रपती संभाजीनगर, 18 सप्टेंबर (हिं.स.) : मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक असून, या प्रश्नासाठी शासन दरबारी प्रभावीपणे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
पार-गोदावरी नदीजोड योजना तसेच कोकणातील उल्हास व वैतरणा खोऱ्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे मंजूर १५५ टीएमसी पाणी अडवून मराठवाड्यातील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त व अवर्षणप्रवण तालुक्यांना समन्यायी पद्धतीने पाणी वाटप करण्याच्या मागणीसाठी मराठवाडा समन्यायी पाणीपुरवठा-पाणी वाटप संघर्ष समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आमदार सत्तार यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.
यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या व भूमिका जाणून घेतल्या. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी सुरू असलेल्या या लढ्याला आपला पूर्ण पाठिंबा असून, हा प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडून मार्गी लावण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी सूक्ष्म नियोजन गरजेचे’
मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात असून, सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून नदीजोड प्रकल्प प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. वैतरणा खोऱ्यातील उपलब्ध पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागाकडे वळविल्यास मराठवाड्याच्या मोठ्या भागाला त्याचा दीर्घकालीन लाभ मिळू शकतो, असे आमदार सत्तार यांनी सांगितले.
गोदावरी नदीच्या पात्रालगतचा भाग वगळता मराठवाड्याचा मोठा भूभाग आजही दुष्काळाच्या झळा सोसत आहे. त्यामुळे मराठवाड्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याचा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
या प्रश्नावर पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठोस पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार सत्तार यांनी यावेळी दिली. मराठवाड्याला सिंचनाचे पाणी उपलब्ध झाल्यास शेतीला स्थैर्य मिळून या भागाच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis