तृणमूलच्या दोन्ही गटांना नवी ओळख; ममता गटाला ‘फुटबॉलपटू’, रॉय गटाला ‘लिफाफा’
नवी दिल्ली , 18 सप्टेंबर (हिं.स.)।तृणमूल काँग्रेसमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाला शुक्रवारी ‘ममता अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस’ हे नाव देण्यात आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रे
तृणमूलच्या दोन्ही गटांना नवी ओळख; ममता गटाला ‘फुटबॉलपटू’, रॉय गटाला ‘लिफाफा’


नवी दिल्ली , 18 सप्टेंबर (हिं.स.)।तृणमूल काँग्रेसमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाला शुक्रवारी ‘ममता अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस’ हे नाव देण्यात आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव देण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील दोन विधानसभा मतदारसंघांत ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक आयोगाच्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे.आदेशानुसार, ममता गटाला निवडणूक चिन्ह म्हणून ‘फुटबॉलपटू’ हे चिन्ह देण्यात आले आहे. तर अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘लिफाफा’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने गुरुवारी रात्री अंतरिम आदेश जारी केला होता. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (एआयटीसी) या नावाच्या वापरावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आगामी पोटनिवडणुकीत दोन्ही गटांना पक्षाचे मूळ नाव वापरण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच, पक्षाचे ‘जोडा घासफूल’, म्हणजेच दोन फुले आणि गवत असलेले पारंपरिक निवडणूक चिन्ह वापरण्यासही दोन्ही गटांना बंदी घालण्यात आली होती.

आयोगाने दोन्ही गटांना शुक्रवारी सकाळपर्यंत त्यांच्या पसंतीची नावे आणि निवडणूक चिन्हे सुचवण्याचे निर्देश दिले होते. एआयटीसीच्या मूळ नावाशी साधर्म्य असलेली नावे ठेवण्याची परवानगी दोन्ही गटांना देण्यात आली. मात्र, त्यांनी अपक्ष उमेदवार आणि नोंदणीकृत मात्र अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांसाठी उपलब्ध असलेल्या निवडणूक चिन्हांच्या यादीतील चिन्हांची निवड करणे आवश्यक होते.पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर विधानसभा मतदारसंघात ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. मतमोजणी ९ ऑक्टोबर रोजी होईल.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसी गटाने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे नवीन निवडणूक चिन्हांचे पर्याय सुचवले होते. यामध्ये क्रिकेट बॅट आणि चेंडू नसलेला फुटबॉलपटू या चिन्हांचा समावेश होता. याशिवाय पक्षासाठी तीन नवीन नावेही सुचवण्यात आली होती.ममता बॅनर्जी गटाने सुचवलेली तीन नावे होती—अखिल भारतीय तृणमूल ममता काँग्रेस, अखिल भारतीय ममता तृणमूल काँग्रेस आणि ममता तृणमूल काँग्रेस.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने दोन्ही गटांना तीन पसंतीची अंतरिम नावे सुचवण्याचे निर्देश दिले होते. तसेच, मुक्त निवडणूक चिन्हांच्या यादीतून तीन पर्याय देण्यासही सांगण्यात आले होते. ही माहिती शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश होते.

निवडणूक आयोगाच्या १४ पानी अंतरिम आदेशात एक बाब स्पष्ट करण्यात आली होती. दोन्ही गटांना त्यांच्या अंतरिम नावांमध्ये मूळ पक्षाशी संबंधित दिसणारे कोणतेही चिन्ह किंवा शब्द वापरण्याची परवानगी होती.आयोगाने सांगितले की, दोन्ही गटांना समान संधी मिळावी तसेच त्यांचे अधिकार आणि हितसंबंध सुरक्षित राहावेत, यासाठी ही अंतरिम व्यवस्था करण्यात आली आहे. अंतिम निर्णय होईपर्यंत ही व्यवस्था लागू राहणार आहे.

यापूर्वी दोन्ही गटांच्या उमेदवारांनी टीएमसीच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फॉर्म-बी देखील सादर केले होते. हे अर्ज पश्चिम बंगाल आणि आसाममधील पोटनिवडणुकांसाठी दाखल करण्यात आले होते.निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते की, पक्षाचे मूळ नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्यावरील बंदी कायम राहील. दोन्ही गटांच्या दाव्यांवर अंतिम निर्णय होईपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. हा अंतिम निर्णय निवडणूक चिन्हे आदेश, १९६८ मधील परिच्छेद १५ अंतर्गत घेतला जाईल.

गुरुवारी झालेला हा आदेश तीन सदस्यीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीनंतर जारी करण्यात आला. आयोगात विवेक जोशी आणि सुखबीर सिंह संधू हेही निवडणूक आयुक्त आहेत.

नवी दिल्ली येथे आयोगाने दोन्ही गटांच्या प्रतिनिधींच्या स्वतंत्रपणे सुनावण्या घेतल्या. अरूप रॉय आणि ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने दुपारी ३ वाजता आयोगाची भेट घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांचे प्रतिनिधित्व करणारे शिष्टमंडळ सायंकाळी ४ वाजता आयोगासमोर हजर झाले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व कल्याण बॅनर्जी यांनी केले यापूर्वी १२ सप्टेंबर रोजीही निवडणूक आयोगाने दोन्ही गटांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande