
बीजिंग , 18 सप्टेंबर (हिं.स.)।चीनने गुरुवारी रशियन तेल आणि वायूच्या खरेदीवर शुल्क (टॅरिफ) लावण्याच्या अमेरिकेच्या ‘लाँग-आर्म ज्युरिस्डिक्शन’च्या प्रयत्नाला विरोध केला. ‘लाँग-आर्म ज्युरिस्डिक्शन’ म्हणजे एखाद्या देशाने आपल्या अधिकारक्षेत्राबाहेरील व्यवहारांवरही कायदे लागू करण्याचा प्रयत्न करणे. चीनने स्पष्ट केले की, इतर देशांसोबतच्या त्याच्या सामान्य व्यापार आणि आर्थिक सहकार्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाने हस्तक्षेप किंवा दबाव आणू नये.
अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने ‘लिंडसे ओ. ग्राहम सॅंक्शनिंग रशिया अँड इराण अॅक्ट २०२६’ हे विधेयक मंजूर केले आहे. या कायद्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रशियावर निर्बंध लादण्यास तसेच भारत आणि चीनसारख्या रशियाच्या प्रमुख व्यापार भागीदारांवर मोठे शुल्क लावण्याचा अधिकार मिळू शकतो.या विधेयकाबाबत विचारले असता, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मंजुरी नसलेल्या अशा कोणत्याही कारवाईला चीनचा विरोध आहे.
गुओ जियाकुन म्हणाले की, चीन इतर देशांसोबत समानता आणि परस्पर लाभाच्या तत्त्वावर सामान्य आर्थिक आणि व्यापारिक सहकार्य करतो. चीन ‘लाँग-आर्म ज्युरिस्डिक्शन’ आणि एकतर्फी निर्बंधांना विरोध करतो. अशा कारवायांना आंतरराष्ट्रीय कायद्यात कोणताही आधार नसतो आणि त्यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मंजुरीही मिळालेली नसते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode