सोलापूर : रेशन तांदळाच्या काळाबाजार प्रकरणी दोघांना अटक
सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। गोरगरिबांच्या हक्काच्या रेशनच्या तांदळाची कथितपणे काळ्या बाजारात उलाढाल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या दोघांना बार्शी तालुका पोलिसांनी शिताफीने अटक केली.दिगंबर ऊर्फ आप्पा स
सोलापूर : रेशन तांदळाच्या काळाबाजार प्रकरणी दोघांना अटक


सोलापूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)। गोरगरिबांच्या हक्काच्या रेशनच्या तांदळाची कथितपणे काळ्या बाजारात उलाढाल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या दोघांना बार्शी तालुका पोलिसांनी शिताफीने अटक केली.दिगंबर ऊर्फ आप्पा संभाजी सुरवसे आणि विवेक ऊर्फ भगवान संभाजी सुरवसे (दोघेही रा. बुरूड गल्ली, बार्शी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

न्यायालयाने संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. पोलिसांच्या तपासाला गुंगारा देण्यासाठी त्यांनी फरार काळात जवळपास सात वेळा मोबाईल क्रमांक बदलल्याचे तपासात समोर आले. तसेच वेशभूषेत बदल करून सोलापूरसह विविध जिल्ह्यांमध्ये लपून राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकाने सोलापूर ग्रामीण सायबर विभागाच्या मदतीने आरोपींच्या हालचालींचे तांत्रिक विश्लेषण केले.या विश्लेषणातून दोन्ही आरोपी बार्शी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतच लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. दोघेही तेथून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पुढील तपास बार्शी तालुका पोलिसांकडून सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande