
रत्नागिरी, 18 सप्टेंबर (हिं.स.) । अरबी समुद्रातील जहाजावर गेल्या 10 एप्रिल रोजी झालेल्या परदेशी प्रवाशाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद काल, १७ सप्टेंबर रोजी जयगड पोलीस ठाण्यात झाली आहे.
अरबी समुद्रात एम.व्ही. रेक एलाइट (MV REK ELITE) या जहाजावर कार्यरत असलेल्या इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू १० एप्रिल रोजी झाला. या प्रकरणी जयगड सागरी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, इस्लाम आदेल अहमद अब्देल लतिफ (वय ३५), व्यवसायाने सेफ्टी ऑफिसर व थर्ड ऑफिसर असून ते इजिप्तचे नागरिक होते. एम.व्ही. रेक एलाइट हे जहाज १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास १४.१० N/५५.२८ E या लोकेशनवर अरबी समुद्रात असताना त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथील अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून १६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.४५ वाजता जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर एम.व्ही. रेक एलाइट या जहाजावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. या प्रकरणाची कागदपत्रे सुरुवातीला यलोगेट पोलीस ठाणे, मुंबई येथे गेली होती. मात्र, घटनास्थळ त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने संबंधित आकस्मिक मृत्यू प्रकरणाची कागदपत्रे परत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आली.
यानंतर रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून १० सप्टेंबर २०२६ च्या आदेशानुसार या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी कागदपत्रे जयगड सागरी पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आली. त्यानुसार जयगड सागरी पोलिसांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.२६ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी जयगड सागरी पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी