
नाशिक, 18 सप्टेंबर (हिं.स.)।
: शासनाच्या लोककल्याणकारी योजना व विविध सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’ गांभीर्याने, नियोजनबद्ध व परिणामकारक पद्धतीने राबवावे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी विषयनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करून विभागप्रमुखांनी आवश्यक आदेश काढावेत. तसेच जिल्हास्तरावर ‘सेवा संकल्प कक्ष’ स्थापन करून विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी आयोजित अभियानाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आडे, उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे (रोहयो), कुंदन हिरे (प्रशासन), नगरविकास विभागाच्या उपायुक्त स्नेहल विसपुते, तहसीलदार प्रदीप वर्पे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड
यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची विभागनिहाय यादी तयार करून प्रत्येक कामासाठी जबाबदार अधिकारी निश्चित करावेत. डेटा एन्ट्रीच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी सनियंत्रण पथक नियुक्त करावे. अभियानाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येणार असल्याने निश्चित कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत.
महसूलविषयक सेवांमध्ये मृत व्यक्तींची नावे शिधापत्रिकेतून कमी करणे, दिव्यांग व तृतीयपंथीय लाभार्थ्यांचा अंत्योदय योजनेत समावेश करणे, सातबारा उतारे अद्ययावत करणे, घरकुलविषयक प्रकरणे मार्गी लावणे, प्रलंबित फेरफार प्रकरणांसाठी फेरफार अदालत घेणे, तसेच लोकअदालतीच्या माध्यमातून कर निर्धारण व मालकी हक्कासंबंधी वाद निकाली काढण्यावर भर द्यावा.
पाणंद रस्त्यांबाबत माहिती फलक लावणे, जलतारा उपक्रम, जलकुंभ स्वच्छता मोहीम, महाराजस्व अभियान, सेवा सेतू, रोजगार मेळावे, करिअर मार्गदर्शन, एकल महिला व आरोग्य शिबिरे, शाळा भेटी, ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता व सायबर सुरक्षितता शिबिरे, योग-ध्यान सत्रे, स्वच्छता ही सेवा व प्लास्टिकमुक्ती जनजागृती असे विविध उपक्रम राबवावेत.
दोन ऑक्टोबर रोजी ‘रस्ते अदालत’ आयोजित करावी. आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांच्या भेटीसाठी अधिकारी नियुक्त करावेत. ‘विकसित भारत सेवा ज्योत यात्रा’, सायकल व स्कूटी रॅली, वीरगाथा व रस्ता सुरक्षितता उपक्रमांद्वारे जनसहभाग वाढवावा. तालुकास्तरावरही विविध कार्यक्रमांचे आयोजन करून लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे. स्वच्छता सेवाकर्मींचा गौरव सोहळाही आयोजित करावा.
अभियानाच्या प्रसिद्धीसाठी जिल्हा माहिती अधिकारी यांनी सर्व माध्यमांचा समन्वय साधणारा एकात्मिक प्रसिद्धी आराखडा तयार करावा. सर्व विभागांनी समन्वयाने कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI