अमेरिकेत शीख ट्रकचालकावर जीवघेणा हल्ला, भारतीय वंशाच्या खासदारांकडून निषेध
वॉशिंग्टन , 18 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेत शीख ट्रकचालकावर जीवघेण्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वायोमिंग राज्यातील एका विश्रांतीस्थळी एका व्यक्तीने या ट्रकचालकाचा वॉशरूमपर्यंत पाठलाग केला आणि चाकूने त्यांच्यावर अनेक वार केले.या हल्ल्यात
अमेरिकेत शीख ट्रकचालकावर जीवघेणा हल्ला, भारतीय वंशाच्या खासदारांकडून निषेध


वॉशिंग्टन , 18 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेत शीख ट्रकचालकावर जीवघेण्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वायोमिंग राज्यातील एका विश्रांतीस्थळी एका व्यक्तीने या ट्रकचालकाचा वॉशरूमपर्यंत पाठलाग केला आणि चाकूने त्यांच्यावर अनेक वार केले.या हल्ल्यात ट्रकचालक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव चिंतेत असलेल्या पीडिताने आपली ओळख केवळ ‘सिंग’ या आडनावानेच जाहीर करण्याची विनंती केली आहे.

अमेरिकेची वृत्तसंस्थानुसार, सिंग यांनी सांगितले की, या हिंसाचारामुळे ते अत्यंत घाबरले असून, आपल्याला का लक्ष्य करण्यात आले, हे त्यांना समजत नाही. “असे का झाले, हे मला माहीत नाही. माझ्यावर हल्ला का करण्यात आला, हेही मला माहीत नाही,” असे त्यांनी सांगितले.सिंग यांनी पुढे सांगितले की, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका हिस्पॅनिक कुटुंबाने त्यांना मदत केली आणि त्यांचा जीव वाचवला. “त्यांनी मला दुसरे आयुष्य दिले,” असे सिंग म्हणाले.

गंभीर जखमी अवस्थेत सिंग यांना पाहताच या कुटुंबातील सदस्य तातडीने त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी सिंग यांच्या जखमांवर उपचार करण्याचा प्रयत्न केला आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत त्यांची काळजी घेतली.या कुटुंबाने वेळीच केलेल्या मदतीमुळेच आपला जीव वाचण्याची आशा निर्माण झाल्याचे सिंग यांनी सांगितले. बुधवारी रात्रीपर्यंत सिंग रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या छातीला आणि बरगड्यांना दुखापत झाली असून, शरीरावर झालेल्या अनेक जखमांमधून ते सावरत आहेत.

या चाकूहल्ल्याप्रकरणी अधिकाऱ्यांनी ४५ वर्षीय अँड्र्यू क्रिस ब्जडक याला अटक केली आहे. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, ब्जडक याच्यावर प्रथम श्रेणीतील हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र, या कागदपत्रांमध्ये हल्ल्यामागील कारण किंवा हेतूचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाच्या सोशल मीडिया पोस्टवरून मोठा वाद निर्माण झाला होता. नंतर ही पोस्ट हटवण्यात आली. या पोस्टमध्ये एका भारतीय ट्रकचालकाचे कार्टून दाखवण्यात आले होते आणि ‘सिंग’ हे आडनाव वापरण्यात आले होते. पोस्टमध्ये, “आमच्या रस्त्यांवरून दूर व्हा. तुम्हाला गाडी चालवता येत नाही, मिस्टर सिंग,” असे लिहिण्यात आले होते. या पोस्टनंतर दक्षिण आशियाई समुदायाने ती वर्णद्वेषी असल्याचा आरोप केला होता.

भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी या हल्ल्याचा निषेध केला. या क्रूर घटनेमुळे आपण भयभीत झाल्याचे त्यांनी म्हटले.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर त्यांनी लिहिले की, “वायोमिंगमधील विश्रांतीस्थळी एका शीख ट्रकचालकावर १७ वेळा चाकूने वार करण्यात आल्याची क्रूर घटना पाहून मी स्तब्ध आहे.”सिख आणि दक्षिण आशियाई अमेरिकी नागरिकांना लक्ष्य करून द्वेषाच्या घटना घडत असताना ही घटना घडल्याचे त्यांनी नमूद केले.

अलीकडेच ट्रम्प प्रशासनाच्या होमलँड सिक्युरिटी विभागानेही वर्णद्वेषी पोस्ट केल्याचा आरोप झाला होता. द्वेष पसरवणाऱ्यांना रोखून दोषींना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी कृष्णमूर्ती यांनी केली.

कॅलिफोर्नियाचे प्रतिनिधी माइक थॉम्पसन यांनीही या घटनेचा निषेध केला. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “ही घटना अत्यंत भयंकर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जबाबदार व्यक्तीला न्यायालयासमोर उभे केले पाहिजे. या कठीण काळात माझ्या संवेदना आणि प्रार्थना सिंग आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande