दिवसभरातील चढ-उतारानंतर, शेअर बाजार संमिश्र निकालांसह बंद
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर (हिं.स.)। दिवसभरातील चढ-उतारानंतर देशांतर्गत शेअर बाजाराने आज संमिश्र कामगिरीसह व्यवहाराची सांगता केली. सुरुवातीला बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र, खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये झालेल्या संघर्षामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत
Stock Market Closing


नवी दिल्ली, 18 सप्टेंबर (हिं.स.)। दिवसभरातील चढ-उतारानंतर देशांतर्गत शेअर बाजाराने आज संमिश्र कामगिरीसह व्यवहाराची सांगता केली. सुरुवातीला बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र, खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये झालेल्या संघर्षामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी मर्यादित पातळीत व्यवहार करत होते. त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने दोन्ही निर्देशांकांनी वरची वाट धरली. मात्र, व्यवहाराच्या अखेरच्या अर्ध्या तासात नफावसुली सुरू झाल्याने बाजारातील तेजी काही प्रमाणात कमी झाली. दिवसअखेरीस सेन्सेक्स ०.०३ टक्क्यांनी घसरला, तर निफ्टी ०.३३ टक्क्यांनी वधारला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २६०.६५ अंक म्हणजेच ०.३५ टक्क्यांच्या वाढीसह ७४ हजार ५७५.२४ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने तो ७४ हजार ३७५.०७ अंकांपर्यंत घसरला. त्यानंतर खरेदी सुरू झाल्याने निर्देशांकात सुधारणा झाली. दुपारी दोननंतर खरेदीचा जोर वाढल्याने सेन्सेक्स एका तासात ४१३.८५ अंकांनी वाढून ७४ हजार ७२८.४४ अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, अखेरच्या टप्प्यात नफावसुली झाल्याने तो ४३३.४८ अंकांनी घसरला आणि १९.६३ अंक म्हणजेच ०.०३ टक्क्यांच्या कमजोरीसह ७४ हजार २९४.९६ अंकांवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६४.१० अंक म्हणजेच ०.२८ टक्क्यांच्या वाढीसह २३ हजार ३३४.७० अंकांवर उघडला. सुरुवातीच्या विक्रीमुळे तो २३ हजार २८६.६० अंकांपर्यंत खाली आला. त्यानंतर खरेदीचा जोर वाढल्याने निफ्टीने तेजी पकडली. दुपारी तीनच्या सुमारास तो ११८.५५ अंकांनी वाढून २३ हजार ३८९.१५ अंकांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. अखेर नफावसुलीमुळे काहीशी घसरण झाली आणि निफ्टी ७५.८० अंक म्हणजेच ०.३३ टक्क्यांच्या वाढीसह २३ हजार ३४६.४० अंकांवर बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहक टिकाऊ वस्तू आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा दबाव राहिला. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा ग्राहक टिकाऊ वस्तू निर्देशांक १.२७ टक्क्यांनी, तर निफ्टी माहिती तंत्रज्ञान निर्देशांक १.०३ टक्क्यांनी घसरला. वाहन आणि एफएमसीजी निर्देशांकही घसरणीसह बंद झाले. दुसरीकडे भांडवली वस्तू क्षेत्रात जोरदार खरेदी झाली. त्यामुळे या क्षेत्राचा निर्देशांक १.५६ टक्क्यांनी वधारला. बँकिंग, आरोग्यसेवा, धातू, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग तसेच तेल आणि वायू क्षेत्राच्या निर्देशांकातही तेजी राहिली.

मध्यम आणि लघु कंपन्यांच्या समभागांमध्येही खरेदीचा जोर दिसून आला. निफ्टी मध्यम कंपन्यांचा निर्देशांक १.२४ टक्क्यांनी, तर लघु कंपन्यांचा निर्देशांक १.७४ टक्क्यांनी वाढला. यामुळे मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ४७९.७९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील सत्रात हे बाजारमूल्य ४७७.८३ लाख कोटी रुपये होते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.९६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

दिवसभराच्या व्यवहारात राष्ट्रीय शेअर बाजारावर ३ हजार २४५ समभागांमध्ये व्यवहार झाला. त्यापैकी २ हजार १५१ समभाग तेजीसह, तर १ हजार ९४ समभाग घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील ३० पैकी १० समभाग वाढले आणि २० समभाग घसरले. निफ्टीतील ५० पैकी २६ समभाग तेजीत, तर २४ समभाग घसरणीत बंद झाले. अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि बजाज फायनान्स हे प्रमुख तेजीत राहिले. तर टीसीएस, टीएमपीव्ही, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, कोल इंडिया आणि मारुती सुझुकीच्या समभागांमध्ये घसरण झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande