हरित कुंभ’ व ‘लोकसंवाद’च्या माध्यमातून पर्यावरणपूरक कुंभमेळ्याचा संदेश
The message of an eco-friendly Kumbh Mela through 'Green Kumbh' and 'Lok Samvad'
The message of an eco


पथनाट्यातून नदी स्वच्छता, प्लास्टिकमुक्त कुंभ व कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती

नाशिक, 18 सप्टेंबर (हिं.स.)।: आगामी कुंभमेळा स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. या उद्देशाने ‘हरित कुंभ जनजागृती कार्यक्रम’ व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यातर्फे सुरू असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमातून नाशिककरांमध्ये पर्यावरण संवर्धन, नदी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्त कुंभाबाबत जनजागृती करण्यात आली.

यशवंत सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाच्या सहकार्याने दिल्ली पब्लिक स्कूल, नाशिकच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून ‘नदी वाचवा, पर्यावरण वाचवा, भविष्य वाचवा’ हा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. बी. डी. भालेकर हायस्कूल पटांगण येथे श्री गणेशोत्सवानिमित्त आयोजित या जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी स्वच्छता, प्लास्टिकचा वापर टाळणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत नागरिकांना संदेश देण्यात आला. ‘नदी स्वच्छता हेच जीवन’, ‘पर्यावरण संवर्धन आपली जबाबदारी’, ‘प्लास्टिकमुक्त कुंभ’ आणि ‘कचरा व्यवस्थापन हाच खरा धर्म’ या संदेशांनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून पर्यावरणपूरक जीवनशैली आणि स्वच्छतेची सवय यांचा थेट संबंध स्पष्ट करण्यात आला. पथनाट्याला गणेश भक्तांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘लोकसंवाद-२०२६’च्या माध्यमातून शासनाच्या विविध जनजागृतीपर संदेशांशी नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हरित कुंभाच्या संकल्पनेत नागरिकांचा सहभाग वाढविणे, पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी जनमानस तयार करणे आणि स्वच्छता व पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असल्याची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. जिल्हा माहिती कार्यालयातील उपसंपादक किरण डोळस यांनी ‘लोकसंवाद’ या उपक्रमाची सविस्तर माहिती देत गणेशोत्सव कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

नाशिक, हरित कुंभ समन्वय समितीचे निशिकांत पगारे, सुनील मेंढेकर, संकेत मेंढेकर तसेच यशवंत सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरणपूरक कुंभमेळ्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता, नदी संवर्धन आणि प्लास्टिकमुक्तीच्या प्रयत्नांत सहभागी व्हावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande