
मुंबई, 18 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात आगामी ‘बंधू’ चित्रपटाच्या टीमने पुण्यातील प्रसिद्ध भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. येत्या २० नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर येणाऱ्या ‘बंधू’ या मराठी चित्रपटातील भावांची जोडी उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी बाप्पाच्या चरणी हजेरी लावत आशीर्वाद घेतला. याप्रसंगी पुनीत बालन यांच्या हस्ते चित्रपटाच्या टीमला सन्मानित करण्यात आले.
यावेळी बाप्पाच्या दर्शनासोबतच भक्तिमय वातावरणात रंगलेल्या भजनाचा जितेंद्र जोशी यांनी मनमुराद आनंद घेतला. भजनाच्या तालात या ‘बंधू’ची ही जोडी अक्षरशः रंगून गेली. त्यानंतर उपेंद्र लिमये, जितेंद्र जोशी आणि दिग्दर्शक नितीन सुपेकर यांनी एकत्रितपणे गणरायाची आरती करत बाप्पाचा आशीर्वाद घेतला. चित्रपटाच्या विशेष पोस्टरचे अनावरणही याप्रसंगी झाले, त्यामुळे ‘बंधू’च्या प्रदर्शनापूर्वीचा हा भक्तिमय क्षण ‘खास’ ठरला.
रजत बेदी प्रस्तुत जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने साकारलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केले आहे.
दोन भावांमधील अतूट प्रेम आणि जिव्हाळ्याच्या नात्याची हळवी, भावस्पर्शी कहाणी घेऊन ‘बंधू’ हा चित्रपट २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule