नव्याने जमीन संपादनाची गरज भासल्यास माजलगाव धरण उंचीचा प्रस्ताव रद्द करू : प्रकाश सोळंके
बीड, 19 सप्टेंबर (हिं.स.) : माजलगाव धरणाची उंची वाढविण्यासाठी नव्याने जमीन संपादित करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास धरणाची उंची वाढविण्याचा प्रकल्प शासनाकडून तातडीने रद्द करून घेण्याची भूमिका असल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले. 22 प्रकल्प
नव्याने जमीन संपादनाची गरज भासल्यास माजलगाव धरण उंचीचा प्रस्ताव रद्द करू : प्रकाश सोळंके


बीड, 19 सप्टेंबर (हिं.स.) : माजलगाव धरणाची उंची वाढविण्यासाठी नव्याने जमीन संपादित करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यास धरणाची उंची वाढविण्याचा प्रकल्प शासनाकडून तातडीने रद्द करून घेण्याची भूमिका असल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगितले. 22 प्रकल्पग्रस्त गावांतील शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही शेतकऱ्याची एक गुंठाही अतिरिक्त जमीन संपादित होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

माजलगाव धरणाची महत्तम पातळी (MWL) 434.80 मीटर असून या उंचीपर्यंतची जमीन यापूर्वीच संपादित करण्यात आलेली आहे. त्यामुळे अतिरिक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता नसल्याचे जलसंपदा विभागाचे मत आहे. मात्र, संपादित जमिनीच्या हद्दखुणा निश्चित करून अनेक वर्षे झाल्याने सद्यस्थितीत जमिनीचे नव्याने सर्वेक्षण करून हद्दखुणा निश्चित करणे आवश्यक असल्याचे सोळंके यांनी सांगितले.

संपादित जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणाचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सर्वेक्षण अहवालानंतर एकाही शेतकऱ्याची एक आर जरी अतिरिक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले, तर माजलगाव धरणाची उंची वाढविण्याचा प्रकल्प शासनाकडून तातडीने रद्द करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सन 2010 मध्ये करण्यात आलेल्या धरणातील गाळाच्या सर्वेक्षणानुसार धरणाची पाणी साठवण क्षमता 45.20 दशलक्ष घनमीटरने कमी झाल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. 2010 नंतर धरणात आणखी गाळ साचला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गाळाचे नव्याने सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

गाळ सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जायकवाडी प्रकल्पाच्या धर्तीवर माजलगाव धरणातील गाळ काढण्याच्या कामाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल. हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आमदार सोळंके यांनी सांगितले.

माजलगाव धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने 2008 मध्येच शासनाकडे सादर केला होता. हा प्रस्ताव आपण आमदार म्हणून शासनाकडे दिलेला नव्हता. मात्र, इतर प्रस्तावित प्रकल्पांसोबत जायकवाडी टप्पा-2 पंचम सुधारणा योजनेत शासनाने माजलगाव धरणाच्या उंची वाढीच्या प्रस्तावाचा समावेश केला, असेही सोळंके यांनी स्पष्ट केले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande