
वॉशिंग्टन, 02 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. अशातच अमेरिकेचे ऊर्जा मंत्री क्रिस राइट यांनी दावा केला आहे की,सोमवार, 31 ऑगस्ट रोजी होर्मुजच्या सामुद्रधुनीतून 17 दशलक्ष बॅरल तेलाची वाहतूक झाली. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनीही मंगळवारी असाच दावा केला.
वृत्तानुसार, एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवार, 1 सप्टेंबर रोजी सुमारे 40 जहाजे या सामुद्रधुनीतून आत-बाहेर गेली. या जहाजांमध्ये लाखो बॅरल तेलाची वाहतूक केली जात होती. दरम्यान, सोबत दिलेल्या केप्लर डॅशबोर्डवर ऑगस्ट महिन्यातील तेल निर्यातीत मोठी घट झाल्याचे दिसून येते. आखाती क्षेत्रातून होणाऱ्या एकूण निर्यातीचा मागील सात दिवसांचा सरासरी दर सुमारे 90 लाख ते 1 कोटी बॅरल प्रतिदिन आहे. यामध्ये होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांसोबतच फुजैराह आणि ओमानमधून होणारी सर्व प्रकारची द्रव मालवाहतूक आणि लोडिंगचाही समावेश आहे.
केप्लर ने आपल्या नव्या आकडेवारीला प्राथमिक स्वरूपाची असल्याचे म्हटले असून, त्यात नंतर वाढ होऊ शकते, असे स्पष्ट केले आहे. ही आकडेवारी कमी निर्यात दर्शवत असली तरी, एखाद्या क्षेत्राच्या साप्ताहिक सरासरीच्या आधारे एखाद्या विशिष्ट दिवसाबाबत अमेरिकेने केलेल्या दाव्याची थेट पुष्टी किंवा खंडन करता येत नाही.
काही काळापूर्वी क्रिस राइट यांनी सांगितले होते की, अमेरिकन सैन्य आणि आखाती देशांच्या सहकार्यामुळे होर्मुजच्या सामुद्रधुनीतून बाहेर जाणाऱ्या तेलाचा सात दिवसांचा सरासरी पुरवठा सुमारे 90 लाख बॅरल प्रतिदिन झाला आहे. याशिवाय, या क्षेत्रातील अलीकडेच अद्ययावत करण्यात आलेल्या पाइपलाइन आणि निर्यात सुविधांच्या माध्यमातून दररोज आणखी 50 ते 70 लाख बॅरल तेल बाहेर पाठवले जात आहे, असेही त्यांनी सांगितले होते.
अमेरिकेने मंगळवारी इराणवर हल्ला केला होता. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दावा केला की, होर्मुजच्या सामुद्रधुनीवर आता जवळपास पूर्णपणे अमेरिकेचे नियंत्रण प्रस्थापित झाले आहे. निर्बंध आणि हल्ल्यांमुळे इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होत असल्याचेही त्यांनी म्हटले.दरम्यान, इराणने बुधवारी अमेरिकेवर हल्ला करून या कारवाईला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode