महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर अभाविपचा दणदणीत विजय;
ABVP's resounding victory


छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत ९-० असा एकहाती विजय

नाशिक, 02 सप्टेंबर (हिं.स.)।

: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS) येथे पार पडलेल्या छात्रसंघ व सिनेट निवडणूक २०२६ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दणदणीत विजय मिळवत सर्वच्या सर्व ९ जागांवर विजयाची नोंद केली आहे. छात्रसंघातील अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, सचिव व दोन सहसचिव अशा सहा पदांसह सिनेटच्या तीनही जागांवर अभाविपच्या उमेदवारांनी विजय मिळवून विद्यापीठात ९-० असा एकहाती विजय संपादन केला आहे. या निवडणुकीत अभाविपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत निमा स्टुडंट्स फोरमचा दारुण पराभव केला आहे.

यापूर्वी छात्रसंघ निवडणुकीतील अध्यक्ष आणि सचिव या दोन महत्त्वपूर्ण पदांवर अभाविपच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर उर्वरित सात जागांसाठी दिनांक १ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीतही अभाविपच्या सर्व उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील छात्रसंघ आणि सिनेटमध्ये अभाविपचे पूर्ण वर्चस्व सिद्ध केले आहे. सिनेट निवडणुकीत लक्ष्मीकांत होनकळस मोकाशे (BHMS), आदित्य रामकिसन जायभाय (BDS) आणि शुभांकर नितीन मनगटे (MBBS) यांनी विजय मिळवला आहे. छात्रसंघ अध्यक्षपदी रोहित मधुकर माळी (BPTH), उपाध्यक्षपदी यशराज धनंजय काकड (BPTH) आणि मिथिलेश श्रीकृष्ण माहोरे (BAMS), सचिवपदी ज्ञानेश्वर रावसाहेब आंधळे (BHMS), तर सहसचिवपदी केशव शरद पाटील (B.Sc Nursing) आणि देवांशी प्रशांत भुराणे (BDS) यांनी विजय मिळवला आहे.

महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधित्वाच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात असून छात्रसंघ आणि सिनेटच्या सर्व नऊ जागांवर विजय मिळवत अभाविपने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आपले भक्कम संघटनात्मक वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविण्यासाठी अभाविपला अधिक बळ मिळाले असून आगामी काळात विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नवनिर्वाचित प्रतिनिधी सक्रियपणे कार्य करतील, असा विश्वास अभाविपकडून व्यक्त करण्यात आला आहे.

या ऐतिहासिक विजयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना अभाविप प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी म्हणाले की, “महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील हा विजय केवळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा विजय नसून महाराष्ट्रातील सर्वसामान्य वैद्यकीय विद्यार्थ्यांचा विजय आहे. राज्यातील ‘जेन झी’ विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा अभाविपवर विश्वास व्यक्त करून अभाविपच्या विचारांना आणि विद्यार्थ्यांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या संघटनात्मक भूमिकेला कौल दिला आहे. देशभरात ज्या-ज्या ठिकाणी छात्रसंघ निवडणुका होत आहेत, त्या सर्व ठिकाणी अभाविप निर्विवादपणे आपले एकहाती वर्चस्व प्रस्थापित करीत आहे. हा विजय राष्ट्रवादी विचारांचा आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा विजय आहे. गेल्या ७८ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या अभाविपच्या कार्याची ही पोचपावती आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, प्रशासकीय व इतर सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अभाविप कटिबद्ध राहील.”

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande