अहमदपूर पोलिसांचा बडगा : नियमभंग करणाऱ्या डीजे मालक व मंडळांवर न्यायालयात खटले
लातूर, 02 सप्टेंबर (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान कायदेशीर अटी व शर्तींचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे मोठ्या क्षमतेच्या डॉल्बी व डीजे सिस्टीमचा वापर करणाऱ्यांवर अहमदपूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी ३ प्रमुख जयंती मं
न्यायालयाचा बडगा


लातूर, 02 सप्टेंबर (हिं.स.)। डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान कायदेशीर अटी व शर्तींचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे मोठ्या क्षमतेच्या डॉल्बी व डीजे सिस्टीमचा वापर करणाऱ्यांवर अहमदपूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी ३ प्रमुख जयंती मंडळांच्या अध्यक्षांसह संबंधित डीजे मालकांवर माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, प्रशासनाने उत्सव काळात डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. मिरवणुकीत मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डॉल्बी वाजवली जात असल्याचे निदर्शनास आल्यावर, पीएसआय रवी बुरकुले यांच्या पथकाने घटनास्थळी 'नॉईज लेव्हल मीटर'द्वारे आवाजाची अचूक पातळी मोजून तांत्रिक पुरावे गोळा केले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या डॉल्बी सिस्टीम तब्बल दोन महिने कायदेशीर प्रक्रियेत अडकून पडल्यानंतर न्यायालयाच्या आदेश आल्यानंतर सोडण्यात आल्या.

यात कारवाई झालेली प्रमुख मंडळे व आरोपी यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ, इंदिरानगर (अध्यक्ष व डीजे मालक), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ, बौद्ध नगर (अध्यक्ष व डीजे मालक) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ, भीम नगर (अध्यक्ष व डीजे मालक) यांचा समावेश आहे.

पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६ च्या कलम १५ व १९ तसेच ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० अंतर्गत हा गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कायद्यानुसार यामध्ये कठोर शिक्षेची तरतूद आहे. दोषी आढळल्यास ५ वर्षांपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा तसेच १ लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. नियमभंग सुरूच राहिल्यास दर दिवशी ५,००० रुपये अतिरिक्त दंड आणि गुन्हा पुनरावृत्त झाल्यास ७ वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.

उत्सवाचा आनंद कोणाच्याही त्रासाचे कारण बनू नये, असे आवाहन करत पोलीस प्रशासनाने पुढील सर्व सण व मिरवणुकांमध्ये डीजे व डॉल्बीचा वापर टाळण्याचे कडक निर्देश दिले आहेत. कर्णकर्कश डीजेच्या दणदणाटामुळे वृद्ध, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि मुक्या प्राण्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. याउलट ढोल-ताशा, लेझिम, झांज व तुतारी यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरामुळे सणाचा उत्साह तर वाढतोच, शिवाय आपली समृद्ध संस्कृतीही जपली जाते.

कायद्याची कठोर अंमलबजावणी टाळण्यासाठी आणि महिनान महिने कोर्टाच्या फेऱ्या व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व मंडळांनी नियमांचे पालन करत पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सव साजरे करावेत, असे आवाहन अहमदपूर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande