

डोंबिवली, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक २७ आणि १९ मधील तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बुधवारी पाणीबाणी मोर्चा काढण्यात आला. पाथर्ली, गोग्रासवाडी, टिळकनगर, अंबिकानगर, सागर्ली, एमआयडीसी, इंदिरानगर आणि खांबालपाडा परिसरातील नागरिक मोर्चात होते.
परिसरात गेल्या महिन्यापासून अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या समस्येबाबत भाजपच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. आयुक्तांची भेट घेतली. इतकेच नाही तर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलवाहिन्या व पाणीपुरवठा व्यवस्थेची तपासणी करण्याची मागणी केली होती. पण काहीच सुधारणा झालेली नाही असा आरोप भाजप नेते व पदाधिकारी करीत आहेत.
मागील १५ वर्षांत या परिसरात एवढ्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला नव्हता. बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आक्षेप आहे.
पाणीटंचाईमुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. खाजगी टँकरद्वारेही पाणी मिळत नाही असे सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला. पालिका अधिकारी शैलेश मळेकर व मादलेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. जन्माष्टमी, गणेशोत्सव आणि नवरात्रीसारखे सण जवळ आले असताना पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
मोर्चात भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक महेश बाबूराव पाटील, नगरसेविका मंदा पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, पूजा पाटील, साई शेलार, अभिजीत थरवळ, विनोद काळण, ॲड. मंदार टावरे, प्रभाग प्रभारी ॲड. मनोज प्रकाश घरत, संजय राणे, संजय विचारे, मिहीर दवते यांच्यासह भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi