
अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.)। सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. अनेक बसस्थानके, सार्वजनिक शौचालये व बाथरूममध्ये अस्वच्छतेचा अनुभव प्रवाशांना येत असताना, चांदूर रेल्वे येथील बसस्थानक मात्र स्वच्छतेच्या बाबतीत वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहे. बसस्थानक परिसर, सार्वजनिक शौचालये व बाथरूमची नियमित स्वच्छता केली जात असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
१ जून २०२६ पासून स्मार्ट सर्व्हिसेस, पुणे यांच्या माध्यमातून चांदूर रेल्वे बसस्थानकातील स्वच्छता व्यवस्थापनाची जबाबदारी सुरू करण्यात आली. त्यानंतर बसस्थानक परिसर अधिक स्वच्छ, नीटनेटका आणि प्रवाशांसाठी सुविधाजनक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दैनंदिन तसेच साप्ताहिक स्वच्छता नियोजनबद्ध पद्धतीने केली जात असून, उपलब्ध आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून परिसराची स्वच्छता राखण्यावर भर दिला जात आहे.वर्दळीच्या बसस्थानकात स्वच्छतागृहे, बाथरूम आणि परिसराची स्वच्छता सातत्याने राखणे हे मोठे आव्हान असते. मात्र, योग्य नियोजन आणि नियमित देखरेखीमुळे चांदूर रेल्वे बसस्थानकात सकारात्मक बदल घडून आल्याचे नियमित प्रवासी सांगतात.आगार व्यवस्थापक जयंत झाडे, बसस्थानक प्रमुख निलेश भगत तसेच स्मार्ट सर्व्हिसेसचे पर्यवेक्षक अमोल भारसाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता कर्मचारी पंकज गिरपुंजे, अर्चना तडस, प्रमिला बोराटकर तसेच बस स्वच्छता कर्मचारी सौरभ पाटील, ज्ञानेश्वर देशमुख आणि गोपाल टेले हे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्या नियमित प्रयत्नांमुळे बसस्थानकातील प्रवाशांना स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण मिळत आहे.पाथरगाव येथील प्रवासी अमोल दुधाट यांनी सांगितले की, पूर्वीच्या तुलनेत आता चांदूर रेल्वे बसस्थानक परिसर अधिक स्वच्छ आणि नीटनेटका दिसून येतो. बसस्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृह, बाथरूम आणि परिसराची नियमित स्वच्छता राखली जात असल्यास त्याचे निश्चितच कौतुक केले पाहिजे. स्वच्छतेत झालेली ही सकारात्मक सुधारणा स्वागतार्ह असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, आगार व्यवस्थापक जयंत झाडे यांनी सांगितले की, १ जूनपासून स्मार्ट सर्व्हिसेसकडे स्वच्छता व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्या कामकाजाबाबत प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि दर्जेदार कसा राहील, यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी