
एसआयआरची प्रारूप यादी प्रसिद्ध; नागरिकांना नाव तपासण्याचे आवाहन
रायगड, २ सप्टेंबर (हिं.स.) : मुंबईसह कोकण विभागात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत न सापडलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोकण विभागातील ७५ मतदारसंघांमध्ये एकूण २ कोटी ४७ लाख ६२ हजार मतदार असून, त्यापैकी सुमारे ७९ लाख मतदार सध्या न सापडल्याचे समोर आले आहे.
न सापडलेल्या मतदारांची प्रारूप यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये तसेच कोकण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी ही यादी तपासून आपल्या नावाची पडताळणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा एसआयआर निरीक्षक रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
एसआयआर प्रक्रियेत नाव सापडले नसल्याने मतदार यादीतून संबंधित मतदाराचे नाव वगळण्यात आले आहे, असा गैरसमज करून घेऊ नये, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी फॉर्म क्रमांक ६ भरून तो संबंधित मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयात सादर करता येणार आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे अपेक्षित आहे.
तसेच नाव, पत्ता किंवा अन्य तपशीलांमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास अथवा मतदार यादीबाबत कोणतीही हरकत असल्यास नागरिकांना दावे-हरकती दाखल करता येणार आहेत. यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
त्यामुळे न सापडलेल्या मतदारांनी तसेच कुटुंबातील पात्र सदस्यांनी प्रारूप यादी तपासून आवश्यक ती कार्यवाही मुदतीत पूर्ण करावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
कोकण विभागातील मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)