
नवी दिल्ली, २ सप्टेंबर (हिं.स.) । भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) विविध टोल प्लाझांवर कथित फसवणूक करून टोल वसुली आणि निधीच्या गैरव्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने बुधवारी उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, जम्मू, मध्य प्रदेश, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि कोलकाता येथील १४ ठिकाणी छापे टाकले.
ईडीच्या माहितीनुसार, एजन्सीच्या लखनऊ प्रादेशिक कार्यालयातील पथके मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ च्या कलम १७ अंतर्गत छापे टाकत आहेत. २२ जानेवारी, २०२५ रोजी नोंदवलेल्या एफआयआर क्रमांक १७ आणि १९ मे, २०२५ रोजी नोंदवलेल्या अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ECIR) क्रमांक ECIR/ASZSO/04/2025 च्या आधारे हा तपास सुरू करण्यात आला. तपासात असे उघड झाले आहे की, विविध एनएचएआय टोल प्लाझांवर अधिकृत प्रणालीच्या बाहेर टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोलमधून मिळालेला महसूल अधिकृत लेखा प्रणालीच्या बाहेर वळवण्यासाठी अनधिकृत सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्सचा कथित वापर केला जात आहे.
तपास यंत्रणेनुसार, निधीचा कथित अपहार आणि सॉफ्टवेअर वापरून तयार केलेल्या अनधिकृत टोल पावत्यांची पुष्टी फॉरेन्सिक तपास आणि एनएचएआयकडून मिळालेल्या नोंदींमधून झाली आहे. तपासातील निष्कर्षांच्या आधारे, ईडीने संबंधित परिसरांमध्ये शोधमोहीम राबवली आहे.
या छाप्यांचा उद्देश प्रकरणाशी संबंधित डिजिटल उपकरणे आणि कागदोपत्री पुरावे जप्त करणे, या प्रणालीतून कथितपणे फायदा मिळवणाऱ्यांना ओळखणे आणि गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा माग काढणे हा आहे. तपासादरम्यान जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे आणि इतर नोंदींची एजन्सीची पथके तपासणी करत आहेत. ईडीने सांगितले की, पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे