
अमरावती, 02 सप्टेंबर, (हिं.स.)। तालुक्यातील भांबोरा, कवठाळ व परिसरात वाघाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या हल्ल्यात चरणदास वासुदेवराव विखे यांचा मृत्यू झाला. घरचा कर्ता माणूस गेल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकऱ्याचा मृत्यू होऊनही सलग पाच दिवस उलटले तरी वनविभागाला वाघाचा ठावठिकाणा लागलेला नाही, अशी ओरड ग्रामस्थ करीत आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार वाटोळा येथे वाघ दिसल्यानंतर वनविभागाला यायला जवळपास एक तास लागला. असे नागरिकांचे म्हणणे आहे. पाऊस नसल्यामुळे शेतात पाय सुद्धा फसत नाहीत. परंतु वाघाला पकडण्यात किंवा त्याचा सुगावा लावण्यात वनविभागाला यश आलेले नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असून जनावरांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरे लावणे, कॅमेरा ट्रॅप वाढवणे, शोधमोहीम राबवणे आणि गावांमध्ये सतत गस्त ठेवण्याची मागणी केली आहे. वन विभागाची टीम नागरिकांचा फोन गेल्यानंतर त्या परिसरात जाते व पाहणी करून काही वेळ थांबून पुन्हा परत येत, अशी ग्रामस्थांची ओरड आहे.
त्यामुळे या वाघाचा शोध लागत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाठोळा येथे वाघ नागरिकांना अगदी गावाजवळ दिसला. त्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. तेव्हा वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर आले आणि घटनास्थळावरून ड्रोन कॅमेऱ्याने पाहणी केली परंतु त्यांना वाघ दिसला नाही. भांबोरा येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला, पुन्हा याच वाघाने दुसऱ्या कोणत्या व्यक्तीचा बळी घेतल्यास फार मोठे नुकसान होईल, त्यामुळे वन विभागाने तातडीने हालचाली करून या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक लोकप्रतिनिधींनी या वाघाचा बंदोबस्त करण्या संदर्भात पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी