
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
मुंबई, 02 सप्टेंबर (हिं.स.) : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी व्यवस्थापक दिशा सालियान यांच्या मृत्यूचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या बहुचर्चित प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला.
दिशा सालियान यांचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मलाड परिसरातील एका उंच इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्या दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या माजी व्यवस्थापक होत्या. सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी दिशा यांचा मृत्यू झाल्याने दोन्ही प्रकरणांबाबत विविध प्रश्न आणि दावे गेल्या काही वर्षांपासून चर्चेत राहिले आहेत. दिशा सालियान यांच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत सतीश सालियान यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेतला होता. तपासात कथित त्रुटी राहिल्याचा आरोप करत त्यांनी एफआयआर दाखल करून नव्याने तपास करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांच्या तपासाच्या पद्धतीवरही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले होते. दखलपात्र स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यास पोलिसांनी नियमानुसार एफआयआर दाखल करून तपास करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. प्राथमिक तपासातून गुन्हा घडला आहे की नाही, हे स्पष्ट करता आले असते, असेही न्यायालयाने म्हटले.
गेल्या 6 वर्षांपासून तपास सुरू असताना पोलिसांकडून केवळ फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम 174 अंतर्गत आकस्मिक मृत्यू अहवालाच्या (एडीआर) आधारे तपास करण्यात आल्याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. अशा तपासाला कायदेशीर मर्यादा असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले.न्यायालयाने पोलिसांना उद्देशून, आतापर्यंत करण्यात आलेला तपास व्यर्थ ठरला आहे का, असा सवालही उपस्थित केला. तसेच, पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टला मृत महिलेचे वडील न्यायालयात आव्हान देऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणात तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे तसेच दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांचा जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दिशा सालियान मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले असून, सीबीआयच्या तपासातून या प्रकरणातील नेमके तथ्य समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी