

मुंबई, २ सप्टेंबर (हिं.स.) : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मौजे ताथवडे, पुणे येथील टप्पा–२ अंतर्गत ६३४ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली.
मंत्रालयातील गृहनिर्माण राज्यमंत्री महोदयांच्या दालनातून या कार्यक्रमाला पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील तसेच मुंबईहून म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल वानखडे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. म्हाडा पुणे मंडळाच्या कार्यालयात सोडतीच्या ठिकाणाहून पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. राहुल साकोरे, उपमुख्य अधिकारी श्री. राहुल शिळिमकर आदी उपस्थित होते.
यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, गेल्या दोन-तीन वर्षात म्हाडाच्या पुणे मंडळाने नवनवीन प्रकल्प हातात हजारो अर्जदारांची गृहस्वप्नपूर्ती केली आहे. ताथवडे परिसरातील योजना पुणे महानगर परिसरात गुणवत्तापूर्ण, नियोजनबद्ध आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या म्हाडाच्या प्रयत्नांना बळकटी देणारी आहे. या योजनेमध्ये चार चाकी वाहनाकरीता प्रती सदनिका एक वाहनतळ देण्यात आले आहे. त्याचबरोबर रहिवाशांकरिता स्विमिंग पूल, क्लब हाऊस, इनडोअर गेम्स क्षेत्र, मुलांसाठी सुसज्ज खेळण्याची जागा, ओपन जिम, सौरऊर्जेवर आधारित ऑन-ग्रिड सोलर प्रणाली, इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) चार्जिंग सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसह आधुनिक व पर्यावरणपूरक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याद्वारे गृहनिर्माण प्रकल्पात व्यावसायिक पद्धतीच्या सुविधा देण्याचा म्हाडाचा स्तुत्य प्रयत्न आहे. याच प्रकल्पात व्यावसायिक दुकाने उभारण्याचे काम सुरू असून भविष्यात त्यांच्या विक्रीविषयी नियोजन सुरू असल्याचे डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. भविष्यात देखील अधिक दर्जेदार, परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले.
सभापती श्री शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, म्हाळुंगे-इंगळे, ताथवडे येथील गृहनिर्माण प्रकल्पात शिल्लक घरे लवकरच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर विक्री करण्याचे प्रस्तावित आहे. शिरूर नगरपालिकेच्या हद्दीत चार एकर प्लॉटवर गृहनिर्माण योजना प्रस्तावित आहे तसेच चाकण एमआयडीसीलगत खराबवाडी ग्रामपंचायतीत १०० गुंठे जागेवर सुमारे ४०० घरांचे बांधकाम सुरू असून याद्वारेही परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत. पुणे मंडळाच्या अखत्यारीतील जुन्या अभिन्यासावरील पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध होणार असल्याचे श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल वानखडे म्हणाले की, गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये म्हाडाने मोठ्या प्रमाणात सदनिका विक्रीसाठी विक्रमी संगणकीय सोडती काढल्या आहेत. २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सदनिकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश होता. भविष्यात देखील अशाच प्रकारे परवडणारी घरे सर्वसामान्यांना म्हाडातर्फे उपलब्ध करून देण्यात येतील. म्हाडाची संगणकीय सोडत पूर्णपणे पारदर्शक, मानवी हस्तक्षेप विरहित असल्याचे श्री वानखडे यांनी सांगितले.
मुख्य अधिकारी श्री. राहुल साकोरे म्हणाले की, सदर योजनेतील मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांकरिता उत्पन्नाची अट शिथिल करण्यात आली होती. यापूर्वी एप्रिल २०२६ मध्ये ताथवडे टप्पा–२ अंतर्गत २४ सदनिका अल्प उत्पन्न गट (LIG) व ७६८ सदनिका मध्यम उत्पन्न गट (MIG)अशा एकूण ७९२ सदनिकांच्या विक्रीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या योजनेसाठी अल्प उत्पन्न गटातील २४ सदनिकांसाठी ४३८ अर्ज, तर मध्यम उत्पन्न गटातील ७६८ सदनिकांसाठी ३०४ अर्ज प्राप्त झाले. यापैकी १३५ यशस्वी अर्जदारांनी स्वीकृती कळविली. अशाप्रकारे ७९२ सदनिकांपैकी १५० सदनिकांच्या वितरणाची कार्यवाही मंडळातर्फे करण्यात आली आहे. उर्वरित अल्प उत्पन्न गटातील १ व मध्यम उत्पन्न गटातील ६३४ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत आज काढण्यात येत आहे. सोडतीसाठी ४८३ अर्ज प्राप्त झाले.
सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाचे अधिकृत यूट्यूब चॅनल @mhadaofficial पेजवरून करण्यात आल्याने अर्जदारांना घरबसल्या सोडतीचे थेट प्रक्षेपण बघता आले. यावेळी कार्यकारी अभियंता श्री. मिलिंद अटकळे, मिळकत व्यवस्थापक श्री. रुपेश जायभाये, श्री. रामचंद्र भोसले आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी