गणेशोत्सवासाठी अमरावती मनपाची जय्यत तयारी; मंडप परवानगी प्रक्रिया होणार ऑनलाइन
अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.) | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने जय्यत तयारी सुरू केली असून, यंदा सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी आणि मंडप परवानगी प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त डॉ. मंगेश गों
गणेशोत्सवासाठी मनपाची जय्यत तयारी मंडप परवानगी प्रक्रिया होणार ऑनलाइन


अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.) | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने जय्यत तयारी सुरू केली असून, यंदा सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी आणि मंडप परवानगी प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विसर्जन, स्वच्छता, वाहतूक, अग्निसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले.

गणेश मंडळांना विविध परवानग्यांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, तसेच प्रक्रियेत पारदर्शकता यावी, यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले. ऑनलाइन अर्जामध्ये मंडळाचे नाव, आयोजकांची माहिती, मंडपाचा पत्ता, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनासंबंधी आवश्यक माहिती भरावी लागणार आहे. गणेश विसर्जन व्यवस्थेवरही बैठकीत विशेष भर देण्यात आला. मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी प्रथमेश तलाव येथे आवश्यक व्यवस्था करण्यात येणार असून, छत्री तलाव येथे कृत्रिम तलाव उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील विविध भागांत कृत्रिम तलाव व आर्टिफिशियल टँकची व्यवस्था करण्यात येणार आहे.

विसर्जनस्थळी प्रकाश व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा, गर्दी नियंत्रण, वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन मदतीची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मंडप उभारणीमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस व मनपाच्या संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने मंडपांतील विद्युत व्यवस्था, आपत्कालीन मार्ग आणि आवश्यक सुरक्षा उपायांची तपासणी केली जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबतही समन्वय साधण्यात येणार आहे. बैठकीस अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक यांच्यासह मनपाचे वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन, आरोग्य, अतिक्रमण, बाजार व परवाना विभागाचे अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande