सोयाबीनच्या उत्पादनात तीस टक्के घटीची शक्यता
अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.) पावसाच्या सरासरीने शेतकऱ्यांची चिंता वाढली, कोरड्या दुष्काळाची चाहूल ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरमध्येही पावसाची सरासरी कमीच राहणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. विश
सोयाबीनच्या उत्पादनात तीस टक्के घटीची शक्यता


अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.)

पावसाच्या सरासरीने शेतकऱ्यांची चिंता वाढली, कोरड्या दुष्काळाची चाहूल

ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरमध्येही पावसाची सरासरी कमीच राहणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे हार्टबिट वाढले आहेत. पावसाच्या असंतूलीत सरासरीने यंदाच्या खरीपात उत्पादनाची सरासरी तीस टक्क्यांनी घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे कोरडवाहू पट्ट्यातील शेतकरी पुन्हा आर्थिक गर्तेत अडकण्यासोबतच जिल्ह्यावर दुष्काळाची छाया आणखी गडद होऊ लागली आहे.

खरीप हंगामात सोयाबीन, कापूस व तूर ही मुख्य पिके घेतली जातात. हंगामातील पहीले पिक सोयाबीन सद्या शेंगा धरण्याच्या स्थितीत असून त्यास पावसाची नितांत गरज आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांना आवर्तन देणे शक्य असले तरी बहूतांश भाग कोरडवाहू असून पावसावर अवलंबून आहे. ऑगस्ट महिन्यात अपेक्षीत २७६ मी.मी. च्या तूलनेत केवळ ४० मी.मी पाऊस झाला आहे. या महिन्यातील पावसाचे सरासरी प्रमाण १४ टक्के आहे. तर, हंगामात १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ७०८ मी.मी. पाऊस अपेक्षीत असताना ४१५ मी. मी. पाऊस झाला आहे. सरासरी ५८ टक्के पाऊस झाला असल्याने हंगामातील तीन महिन्यातील पावसाची तूट मोठी आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हावमान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे झाले आहे. विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत सोयाबीन शेंगांवर आले आहे. दाणे परिपक्वतेच्या स्थितीत आहेत. पावसाची नितांत गरज असताना हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांचे हार्टबिट वाढले आहे. पाऊस न आल्यास सोयाबीनच्या उत्पादन सरासरीत तीस टक्के घट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हेक्टरी ४.४८ क्विंटलचा अंदाज

यंदा मॉन्सूनचे आगमन विलंबाने झाले असले तरी जुलैतील पावसाने पेरणीचे क्षेत्र ९४ टक्क्यांवर पोहोचले. यामध्ये सोयाबीन २ लाख ५ हजार २९२ , कापूस २ लाख ६९ हजार ८८२, तूर १ लाख १२ हजार २९९ हेक्टर क्षेत्रात आहे. हंगामातील पहिले पिक सोयाबीन असून सद्या ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. गत हंगामात सोयाबीनची जिल्ह्यातील उत्पादकता हेक्टरी ६.४० क्विंटल होती. यंदा पावसाची स्थिती बघता तीस टक्के घट येण्याचा अंदाज असल्याने ती या हंगामात ४.४८ क्विंटल प्रती हेक्टर राहण्याची शक्यता आहे.

--------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande