धाराशिव येथे ५-६ सप्टेंबर रोजी विविध महिला लोककलांचे सादरीकरण
धाराशिव, 02 सप्टेंबर (हिं.स.)। ‘महिला लोककला महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा जागर महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला व लोकपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्
धाराशिव येथे ५-६ सप्टेंबर रोजी विविध महिला लोककलांचे सादरीकरण


धाराशिव, 02 सप्टेंबर (हिं.स.)।

‘महिला लोककला महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा जागर

महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला व लोकपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या वतीने ‘महिला लोककला महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.हा महोत्सव दि.५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता आणि दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता स्वयंवर मंगल कार्यालय,बार्शी नाका,धाराशिव येथे होणार आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि पारंपरिक सांस्कृतिक जीवनात महिलांनी जपलेल्या लोककला, लोकपरंपरा आणि लोकसंगीताला विशेष महत्त्व आहे.या परंपरांचे दर्शन व्यापक स्तरावर घडवून आणण्यासाठी तसेच महिला कलाकारांना आपल्या पारंपरिक कलांचे सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात मंगळागौर,आराधी नृत्य,लावणी, एकतारी भजन, भारूड,भोंडला,भुलाबाई गाणी, शाहिरी आणि मैदानी खेळ अशा विविध लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकजीवन,परंपरा,श्रद्धा,उत्सव आणि सामाजिक-सांस्कृतिक मूल्यांचे प्रतिबिंब या लोककलांमधून अनुभवता येणार आहे.

महिलांनी पिढ्यान्पिढ्या जतन केलेल्या पारंपरिक कलांचे संवर्धन करून त्यांना आधुनिक काळातही प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे,हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.लोककलेच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच महिला लोककलावंतांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य,इलेक्ट्रॉनिक्स,माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाच्या जतन,संवर्धन व प्रसारासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘महिला लोककला महोत्सवा’साठी प्रवेश विनामूल्य असून,धाराशिव तसेच परिसरातील नागरिक, कलारसिक आणि लोककला प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande