
रत्नागिरी, 2 सप्टेंबर, (हिं.स.) । आम्ही सिद्ध लेखिका अखिल भारतीय साहित्य संस्थेच्या रत्नागिरी कोकण विभागातर्फे रत्नागिरीतील कवी-कवयित्रींसाठी आयोजित करण्यात आलेला ‘रिमझिम रिमझिम’ हा काव्यमय कार्यक्रम रत्नागिरीत उत्साहात पार पडला. रत्नागिरीतील कवी-कवयित्रींना आपली काव्यप्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या कार्यक्रमाला कवींसह श्रोतेवर्गाचीही उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
रत्नागिरीतील अ. के. देसाई हायस्कूलच्या रंगमंचावर रंगलेल्या या कार्यक्रमात २० कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला. पावसाळा, निसर्ग, श्रावण आणि विविध भावविश्व उलगडणाऱ्या कवितांच्या सादरीकरणाने कार्यक्रम बहारदार झाला. कोकण विभाग प्रमुख सुनेत्रा जोशी व कार्यकारिणी सदस्य ऋतुजा कुलकर्णी यांच्यासह समूहातील ज्येष्ठ सदस्या कुंदा बापट उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रा. उमा जोशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुनेत्रा जोशी यांनी मनोगतात संस्थेची माहिती दिली. तसेच राज्य कार्यकारिणीत प्रसिद्धी प्रमुख म्हणून जबाबदारी घेतलेल्या ऋतुजा कुळकर्णी यांचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी नवकवींना झटपट प्रसिद्धीच्या मागे न लागता सातत्याने सराव करून लिहिण्याची तसेच सादरीकरण करण्याची कला आत्मसात करावी असे सांगितले. कार्याध्यक्ष ऋतुजा कुलकर्णी, तंत्रज्ञान सहाय्यक उमा जोशी यांनी या कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले.
या काव्यमैफलीत वैजयंती पाटील, शमा प्रभुदेसाई, दीप्ती झगडे, प्रियांका रांजे, शर्विल रांबाडे, अनुष्का नागवेकर, श्रावणी शिंदे, कुंदा बापट, चित्रा गोस्वामी, वसुंधरा जाधव, रोहित नाटेकर, मानसी चव्हाण, प्रभात कोकझे, स्नेहल शेवडे, गौरी थत्ते, उमा जोशी, विस्मया कुलकर्णी, तन्वी पटवर्धन, अनुराधा आपटे, सुनेत्रा जोशी आणि ऋतुजा कुळकर्णी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा आपटे यांनी केले.
कार्यक्रमात ज्यांची कविता उत्तम व सादरीकरण छान होते, त्यांना पुस्तक देऊन गौरविण्यात आले. उपस्थित सर्वांना पेन देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. आणि कार्यक्रमात सादर झालेल्या कवितांचे ईबुक तयार करण्यात येणार असल्याचा सुखद धक्का देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी