
अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील नो-एन्ट्रीच्या नियमांना अक्षरशः केराची टोपली दाखवत रेती वाहतूक करणारे ट्रक बिनधास्तपणे रस्त्यावर धावत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. साईनगर कमानपासून अकोली मार्गे भातकुलीकडे दररोज सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात रेतीचे ट्रक नो-एन्ट्री असतानाही सुसाट धावत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेष म्हणजे, या ट्रकमधील काही वाहने क्रमांकफलकाविनाच रस्त्यावर धावत असल्याचे सांगण्यात येत असून, हा प्रकार वाहतूक पोलिसांसह संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
शहरात जड वाहनांसाठी नो-एन्ट्रीचे नियम असताना रेतीने भरलेले ट्रक कोणाच्या आशीर्वादाने शहरातून धावत आहेत, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. वाहतुकीची कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांच्या जीविताला निर्माण होणारा धोका याकडे संबंधित यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का, अशीही चर्चा सुरू आहे. गेल्या एक ते दीड महिन्यांपूर्वी राजापेठ उड्डाणपुलावर अशाच एका बिननंबरच्या ट्रकने दोन महिलांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर काही दिवस पोलिस प्रशासनाने शहरात ट्रकची तपासणी आणि नाकाबंदी मोहीम राबविली. मात्र, कालांतराने ही कारवाई थंडावल्याचे चित्र असून, आता पुन्हा नो-एन्ट्रीच्या वेळेत रेतीचे ट्रक खुलेआम धावत आहेत.
एखादा आणखी भीषण अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? बिननंबर वाहने कोणत्या परवानगीवर रस्त्यावर धावत आहेत? नो-एन्ट्रीचे नियम सर्वसामान्यांसाठीच आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस आणि वाहतूक विभागाने तातडीने या मार्गावर विशेष नाकाबंदी करून नो-एन्ट्रीत धावणाऱ्या तसेच बिननंबरच्या ट्रकांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एखाद्या निष्पापाचा जीव गेल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी