छ. संभाजीनगर - भायगव्हाण येथे शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 02 सप्टेंबर (हिं.स.)। घनसावंगी तालुक्यातील मौजे भायगव्हाण येथे ''रेशीम उद्योगाच्या उन्नतीसाठी रेशीम तंत्रज्ञानाची जनजागृती'' या विषयावर एकदिवसीय शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय रेशीम मंडळ,
अ


छत्रपती संभाजीनगर, 02 सप्टेंबर (हिं.स.)। घनसावंगी तालुक्यातील मौजे भायगव्हाण येथे 'रेशीम उद्योगाच्या उन्नतीसाठी रेशीम तंत्रज्ञानाची जनजागृती' या विषयावर एकदिवसीय शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय रेशीम मंडळ, संशोधन विस्तार केंद्र (औरंगाबाद) आणि रेशीम संचालनालय, जिल्हा रेशीम कार्यालय (जालना) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ-बी श्री. अंकुश सुभाष गाडगे यांनी शेतकऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. ते म्हणाले की, सध्याच्या बदलत्या हवामानात आणि अनिश्चित पावसाच्या काळात पारंपारिक पिकांना पूरक म्हणून रेशीम शेती हा एक उत्तम आणि शाश्वत उपजीविकेचा पर्याय ठरत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी तुती लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, सुधारित तुती जाती, बागेचे खत व पाणी व्यवस्थापन, कीड व रोगांचे एकात्मिक नियंत्रण, रेशीम कीटक संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण, दर्जेदार चॉकी अळ्यांचा वापर, तापमान व आर्द्रता व्यवस्थापन, प्रौढ अळी संगोपन, योग्य माउंटेजचा वापर, दर्जेदार कोष उत्पादन आणि कोष विक्री व्यवस्थापन आदी विविध तंत्रज्ञानांची सविस्तर माहिती दिली. यशस्वी रेशीम पीक घेण्यासाठी या सर्व तंत्रज्ञानाचा एकात्मिक पद्धतीने अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागातील युवकांनी केवळ पारंपरिक शेती किंवा नोकरीवर अवलंबून न राहता रेशीम शेतीकडे मुख्य उत्पन्नाचा स्रोत आणि कृषी-आधारित व्यवसाय म्हणून पाहावे, असे आवाहनही श्री. गाडगे यांनी केले. रेशीम शेतीमध्ये तुती लागवड, चॉकी संगोपन, रेशीम कीटक संगोपन, कोष उत्पादन, धागानिर्मिती आणि मूल्यवर्धित वस्तूंच्या निर्मितीपर्यंत रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. युवक आणि महिलांच्या सहभागातून गावपातळीवर रेशीम उद्योगाची मजबूत मूल्यसाखळी विकसित होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी जिल्हा रेशीम कार्यालय, जालना येथील क्षेत्रीय सहाय्यक श्री. शरद जगताप यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी 'सिल्क समग्र-2', 'नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना' (पोकरा) आणि 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना' (मनरेगा/व्हीबीजीआरएएमजी) योजनेअंतर्गत तुती लागवड, सिंचन सुविधा, रेशीम कीटक संगोपनगृह, संगोपन साहित्य आणि इतर आवश्यक घटकांसाठी उपलब्ध आर्थिक सहाय्याबाबत मार्गदर्शन केले. पात्र शेतकऱ्यांनी संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी भायगव्हाणचे सरपंच श्री. सुनील कोरडे यांनी उपस्थित अधिकारी व शास्त्रज्ञांचे बहुमोल तांत्रिक मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. रेशीम शेतीच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांचे आर्थिक भविष्य अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत, शेतकरी आणि रेशीम विभाग परस्पर समन्वयाने कार्य करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच गावामध्ये रेशीम शेतीचा प्रसार करून तुती लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी रेशीम शेतीतील तांत्रिक अडचणी, आर्थिक सहाय्य, कीड व रोग व्यवस्थापन आणि कोष विक्री याबाबत प्रश्न विचारले. शास्त्रज्ञ व विभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. या शास्त्रज्ञ–शेतकरी संवादामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये रेशीम शेतीविषयी जागरूकता निर्माण झाली असून, गावातील युवक आणि शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग स्वीकारण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद व्यक्त केला.

या कार्यशाळेस गावातील प्रगतिशील शेतकरी, युवक, ग्रामस्थ तसेच रेशीम विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande