अंजनगाव सुर्जी शहरातील मोकाट गोवंशाच्या संख्येत अचानक घट; नागरिकांची चौकशीची मागणी
अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.)। अंजनगाव सुर्जी शहरात मोकाट फिरणाऱ्या गोवंशीय जनावरांच्या संख्येत अचानक घट होत असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी रस्त्यांवर मोठ्या संख्येने दिसणारी जनावरे अचानक गायब होत असल्याचा दावा स्थानिक
अंजनगाव सुर्जीत बेपत्ता  होणाऱ्या जनावरांमुळे संशयाचे सावट; चौकशीची मागणी


अमरावती, 02 सप्टेंबर (हिं.स.)। अंजनगाव सुर्जी शहरात मोकाट फिरणाऱ्या गोवंशीय जनावरांच्या संख्येत अचानक घट होत असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी रस्त्यांवर मोठ्या संख्येने दिसणारी जनावरे अचानक गायब होत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, महामार्गालगतचे रस्ते आणि वसाहती परिसरात कायम वावरणारी अनेक जनावरे अलिकडच्या काळात दिसेनाशी झाली आहेत. ही जनावरे नेमकी कुठे जात आहेत, त्यांची विल्हेवाट कशी लावली जाते किंवा त्यांची वाहतूक कोण करत आहे, याबाबत प्रशासनाकडे स्पष्ट माहिती उपलब्ध आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

काही नागरिकांनी शहरात दलालांचे जाळे सक्रिय असल्याचा आरोप केला आहे. तसेच काही व्यक्ती स्वतः नियमित पशुपालक नसतानाही गोवंशीय जनावरे पाळून नंतर ती शहरात मोकाट सोडतात, असा दावाही केला जात आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, त्याची सत्यता तपासणे आवश्यक आहे.

यामुळे अनेक गंभीर प्रश्न समोर येत आहेत. शहरातील मोकाट जनावरांची अधिकृत नोंद आहे का? त्यांना ओळख पटविण्यासाठी टॅगिंग करण्यात आले आहे का? जनावरे पकडल्यास त्यांची नोंद कुठे केली जाते? गोशाळांमध्ये किती जनावरे दाखल झाली आहेत? संबंधित विभागांकडे याची अद्ययावत माहिती आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे नागरिक मागत आहेत.शहरातील मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी, अपघात, पिकांचे नुकसान आणि अस्वच्छतेच्या तक्रारी सातत्याने होत असतानाही या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत, याबाबतही नागरिकांमध्ये नाराजी आहे. जर जनावरे खरोखरच गहाळ होत असतील, तर त्यामागे निष्काळजीपणा आहे की संघटित गैरप्रकार, याची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि नगर परिषद यांनी संयुक्त विशेष तपास पथक स्थापन करून मोकाट जनावरांची प्रत्यक्ष गणना, मालकांची पडताळणी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि जनावरांच्या हालचालींची नोंद तपासावी, अशी मागणी केली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सार्वजनिक करावा, अशीही मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande